पान:महाराष्ट्रातील किल्ले (भाग २).pdf/12

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

त्याचे दगड टांकीचे असून तो मजबूत रीतीने बांधलेला आहे. त्याच्या भिंती साधारणपणे ३० फूट उंच व १० फूट रुंद आहेत. इ० स० १८१८ त या किल्ल्याचे संबंधानें मेजर डिकिनसन याने असे वर्णन केले आहे की, " हा किल्ला फार चांगल्या स्थितीत आहे. त्याला चार बुरूज असून त्याला तोफा व बंदुका उडविण्याकरिता भोंके आहेत, परंतु त्याच्या गच्चया पडून गेल्या आहेत. किल्लयांत बऱ्याच इमारती आहेत, परंतु त्या नादुरुस्त आहेत. किल्लयांत राहण्यासारखें एकही घर नाही. आंत एक पाण्याची विहीर आहे, परंतु ती पडून गेलेली आहे, व तिचे पाणी नासून गेलेलें आहे. किल्लयाचा दरवाजा भक्कम आहे." इ० स० १८६२ त त्याचे असें वर्णन केलेले आहे की, " हा किल्ला फार मजबूत आहे, परंतु हल्ली त्यांत कांटेरी झाडेझुडपें वाढलेली आहेत, व आंतील विहीर . अगदी पडून गेलेली आहे." __हा किल्ला पोर्तुगीज लोकांनी बांधला असावा असे वाटते. डहाणू येथें इ० स० १५३३ पासून इ० स० १७३८ पर्यंत पोर्तुगीज लोकांचा अमल होता. इ० स० १७३९ त चिमणाजी आप्पानें डहाणू शहर घेतले त्या वेळी डहाणूचा किल्ला मराठ्यांचे ताब्यात गेला. पुढे इ० स० १८१८ त त्याचे स्वामित्व इंग्लिशांकडे आले. या किल्ल्याचे संबंधानें महत्त्वाची अशी कोणतीही ऐतिहासिक गोष्ट उपलब्ध नाही. डहाणू हे एक प्राचीन काळचे शहर असावे असें वाटते; कारण नाशीक जिल्ह्यांतील एका कोरीव लेण्यांत नहपान याचा जामात उशवदत्त याने डहाणूक नदीवर नाव बांधिली असें वर्णन केलेले आहे.