पान:महाराष्ट्राचे पंचप्राण.pdf/७८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(७३)

आपले चरित्रनायक बळवंतराव यांचेही लाड त्यांचे आजोबा रामचंद्रपंत हे करीत असत.
 आपल्या जन्माचे वेळीं व लहानपण आजोबा जिवंत असणें हीं फारच भाग्याची गोष्ट आहे. आजोबा नसले तर निदान आजी तरी जिवंत असावी. असो. आपले लोकमान्य बाळ फारच नशीबवान, कारण त्यांचा जन्म झाला तेव्हां त्यांचे आजोबा जिवंत होते. शिवाय हें बाळ नवानवश्याने झालेले, मग काय विचारतां !
लोकमान्य बळवंतराव यांचे वडिलांचे नाव गंगाधरपंत असें होतें. गंगाधरपंत यांना पहिल्या प्रथम मुलगीच झाली व या मुलीच्या पाठीवर दोन मुलीच झाल्या, तेव्हां गंगाधरपंतांच्या पत्नीला अजूनहीं आपल्याला पुत्र होत नाहीं म्हणून फार वाईट वाटले. ती फार भाविक व देवभोळी होती. तेव्हां पुत्र व्हावा म्हणून तिनें सूर्यदेवाची अनन्यभावानें व मोठ्या भक्तीनें वर्ष दीडवर्ष एकसारखी आराधना केली. तेव्हां सूर्यदेव त्या साध्वीच्या व्रतानें व भक्तीने प्रसन्न झाला व त्यानें तिची इच्छा पूर्ण केली. अशा रीतीनें सूर्यदेवाच्या कृपेनें गंगाधरपंत यांना शके १७७८ आषाढ वद्य षष्ठीस म्हणजे सन १८५६ च्या जुलै महिन्याचे २३ वे तारखेस बरोबर सूर्योदयाचे वेळी रत्नागिरी येथें पुत्ररत्न झाले. तें पुत्ररत्न म्हणजेच आपले चरित्रनायक बळवंतरावजी बळवंतरावांच्या चरित्रांत सर्वच विलक्षण आहे. त्याप्रमाणे त्यांच्या नांवाचीही विलक्षण तन्हा आहे. वास्तविक बळवंतरावांचें मूळचें नांव कांहीं बाळ हें नाहीं. त्यांचें मूळचें खरें नांव वासुदेव असे होते. तर मग बाळांनों, तुझी सहजच विचाराल की, 'कायहो जर त्यांचें नांव वासुदेव होतें तर त्या वासुदेव नांवाला मार्गे टाकून लोकमान्य बाळ कसे झाले ? ' त्याचें उत्तर असें. आपले लोकमान्य पहिलेवहिले मुलगे. बाळांनों, तुझांला माहीतच आहे कीं, पहिला मुलगा घरांतील सर्व मंडळींचा व विशेषतः आईचा अतिशय लाडका असावयाचा व पहिल्या मुलाला 'बाळ' या प्रेमळ नांवानें आई हांक मारावयाची, व मग घरांतील