पान:महाराष्ट्राचे पंचप्राण.pdf/७६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(७१)

आहे तेंही फार वाचनीय झाले आहे. त्यावरून कोणत्याही संकटप्रसंगीं त्यांची कशी शांत वृत्ति रहात असे हें दिसून येतें. याशिवाय ' वाक्यमीमांसा ' या नांवाचें मराठी व्याकरणावर त्यांनी एक पुस्तक लिहिलें आहे, तेही उत्कृष्ट साधले आहे. याशिवाय सुधारकांतील व केसरींतील त्यांचे लेख अत्यंत वाचनीय होते. सुदैवानें त्या लेखांतील उत्तम लेखांच्या संग्रहाचे तीन भाग पुस्तकरूपाने छापले आहेत. यामुळे ते आपणांला वाटेल तेव्हां वाचावयाला सांपडतील.

प्रिन्सिपाल आगरकरांची राहणी.

 गोपाळरावजी जसे मनानें साधे होते तसे पोषाखाने देखील अगदी साधे होते. त्यांचे चरित्र व लेख वाचल्यावर हे मोठे सुधारक तेव्हां हे नेकटाय, कॉलर, बूट, पाटलोण वगैरेनीं अगदीं नटलेले असतील असा प्रथम समज होतो. पण त्यांचा फोटो पाहिला म्हणजे तो ताबडतोब दूर होतो. प्रि. आगरकर हे खरे कळकळीचे सुधारक होते, पोषाखी सुधारक नव्हते. ते नेहमीं स्वदेशी कपडा वापरीत असत. झकपक परदेशी कपड्यांपेक्षां मिळेल तसा जाडा भरडा स्वदेशी कपडा त्यांना अधिक प्रिय असे.
 त्यांची राहणी संताला शोभेल अशी अगदर्दी साधी असे. त्यांनीं देशहित ही एकच गोष्ट आपल्या डोळ्यांसमोर ठेवली होती. ते पुष्कळ पैसा मिळविण्याचे फंदांत कर्धीच पडले नाहींत. जे कांहीं थोडे पैसे मिळत त्यांत अगदीं काटकसरीनें व ठाकठिकीनें ते रहात असत. ते कधीं कोणाचें कांहींही उसनें घेत नसत व कर्ज कधींही काढीत नसत. देशहित साधण्यासाठी प्रसंग कडक व कडू बोलण्याचा प्रसंग आला तरी तसें बोलण्याला ते कचरत नसत. मग त्यामुळे लोकांची अप्रीते पतकरावी लागली तरी तिला ते तयार असत. अशा तऱ्हेची तुकोबारायांना शोभेल अशी त्यांची साधुवृत्ति असे. बाळांनो, असेच तुम्ही सुशील, शांत, व स्वार्थत्यागी देशभक्त व्हा.