पान:महाराष्ट्राचे पंचप्राण.pdf/७५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ७० )

हे मोठे दृढनिश्चयी व करारी असत. एकदां अमुक एक गोष्ट करावयाची असा त्यांनीं निश्चय केला म्हणजे तो तडीस नेल्याशिवाय ते कधींही रहात नसत. मग कितीही विघ्नं आली तरी त्यांस ते जमानीत नसत.

त्यांची शिक्षणपद्धति

 प्रि. आगरकर हे अतिशय उत्तम शिक्षक होते. याचें मुख्य कारण शिकवीत असतांना शिकविण्याच्या विषयांत त्यांचें मन अगदीं तल्लीन होऊन जात असे. शिवाय जो विषय शिकवावयाचा त्या विषयावरील सर्व टीका व ग्रंथ आधीं वाचून त्या विषयाची ते आगाऊ उत्तम तयारी करीत असत. त्यांची शिकविण्याची पद्धत विद्यार्थ्यांना फार आवडत असे, याचें कारण विषय कितीही कठीण व रुक्ष असला तरी तो मनोरंजक व सुबोध कसा करावा हे त्यांना फार चांगलें साधलें होतें. या तीन गोष्टींमुळे प्रि. आगकरांचा तास केव्हां येईल असें विद्यार्थ्यांना होत असे.

लेखननैपुण्य

 प्रि. आगरकरांची मराठी भाषा ही अगदी निराळ्याच वळणाची होती. तिच्यामध्ये कायदेशीर कडकपणा बिलकूल सांपडत नसे. त्यांची भाषा संस्कृत भाषेप्रमाणें सुंदर व गोंडस असे. सुंदरतेबरोबर त्यांच्य भाषेमध्यें स्पष्टवक्तेपणा व तेजस्विताही झळकत असे. ज्याप्रमाणें मराठी लिहिण्यांत त्यांचा हातखंडा होता तसाच इंग्रजी लिहिण्यांतही होता. भाषांतर ते इतकें बेमालूम व सुंदर करीत कीं, हें स्वतंत्र- तेनें मराठीत लिहिलें आहे का हें इंग्रजीचे भाषांतर आहे हे अतिशय हुषार माणसाला देखील ओळखता येत नसे. त्यांची भाषांतर करण्याची हातोटी पहावयाची असल्यास त्यांनी केलेले हॅम्लेट नाटकाचें भाषांतर वाचावें. हॅम्लेट नाटकाचें 'विकारविलसित' नांवाचें भाषांतर अतिशय लोकप्रिय झालेलें आहे. या पुस्तकाशिवाय 'आमचे डोंगरांवरील १०१ दिवस ' या नांवाचें आपल्या तुरुंगवासाचें त्यांनीं एक पुस्तक लिहिलें