पान:महाराष्ट्राचे पंचप्राण.pdf/७२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(६७)

 आगरकरांनी उचललेल्या पद्धतीमुळे ते अत्यंत देशहितबुद्धीने रात्रंदिवस काम करीत होते. तरी त्यांचेविषयीं लोकांत गैरसमज उत्पन्न झाले. यामुळे त्यांना लोकप्रीतीला कांहीं काळ मुकावें लागले, तरी त्यांची स्वार्थत्यागपूर्वक केलेली देशसेवा, त्यांना वाटत असलेली देशाबद्दलची कळकळ व त्यांची सुधारकांतील सुंदर व तेजस्वी भाषा या तीन गोष्टींनीं त्यांना पुनः लोकप्रिय केलें.
 आगरकरांनीं सुधारक पत्र काढले त्यांत लोकांना कोणत्या गोष्टीबद्दल उपदेश केला होता हे जाणण्याची बाळांनों, तुम्हांला सहजच इच्छा होईल, म्हणून त्यांतील मुख्य मुख्य गोष्टी कोणत्या होत्या हें आतां तुम्हांला सांगतों, त्या ह्याः-
 सुधारक पत्राचा बाणा इष्ट असेल तें बोलणार व शक्य असेल तें करणार ' असा होता.
 २ नशिबावर हवाला ठेवणें हें वाईट, उद्योगावर विश्वास ठेवून सतत उद्योग करीत रहावें, हे चांगलें.
 ३ संन्यासी होण्यापेक्षां परोपकारी सद्गृहस्थ होणे अधिक चांगलें.
 ४ मनुष्य ज्या जातींत जन्मला असेल त्या जातीवरून त्याची योग्यता ठरवूं नये. त्यानें जी कृत्ये केली असतील त्यांवरून त्याची योग्यता ठरवावी. उदाहरणार्थ, तुकाराम वाणी होता म्हणून त्याला कमी मानूं नये तर त्याला ब्राम्हणाप्रमाणें पूज्य मानावें; व कलुषा ब्राह्मण असला तरी त्याच्या वाईट कृतीमुळे त्याला अत्यंत नीच मानावें.
 ५ हिंदुधर्मातील वाईट चाली नाहींशा कराव्या.
 ६ वाईट चाली बंद करण्यासाठी कायदे करून घेण्यास हरकत नाहीं.
 ७ पुरुष व स्त्री यांची योग्यता सारखी मानावी.
 ८ मुली व मुलगे मोठे झाल्यावर त्यांची लग्ने करावीं.
 ९ पुरुष व स्त्री या दोघांनाही धंदेशिक्षण यावें. दोघांनाही उच्च शिक्षण द्यावे.