पान:महाराष्ट्राचे पंचप्राण.pdf/७०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(६५)

महाराष्ट्राचे पंचप्राण बनले आहेत. आणि खरोखर पाहिलें तर ईश्वरभक्ति म्हणजे दुसरी तिसरी कांहीं नाहीं. निष्काम बुद्धीनें लोकहित किंवा जनसेवा करणे हीच ईश्वराची उत्तम भक्ति होय.
 या दोन वीरांचा इकडे हा पवित्र स्वार्थत्यागपूर्ण निश्चय होत असतां तिकडे कै. विष्णुशास्त्री चिपळूणकर यांनी सरकारी नोकरीचा राजीनामा दिला व स्वतंत्रतेनें शाळा काढून व इतर धंदे करून अब्रूने उदरनिर्वाह करतां येतो व देशसेवाही करता येते हें तरुण सुशिक्षित मंडळीस आपल्या उदाहरणाने दाखविण्याचा त्यांनी निश्चय केला.
 शास्त्रीबोवा एक इंग्रजी शाळा काढण्याच्या विचारांत आहेत, ही बातमी आगरकर व टिळक यांना कळतांच त्यांनी आपण होऊन या शाळेस आम्ही येऊन मिळतों, अर्से शास्त्रीबोवांना कळविलें. मग शास्त्रीबोवा, आगरकर, टिळक व आणखी दुसरे त्यांचे स्नेही यांनी सन १८८० चे जानेवारीचे पहिलीपासून 'न्यू इंग्लिश स्कूल स्थापन केलें. तें एकदम भरभराटीस चढलें, व त्याची कीर्ति सर्वत्र पसरली. नंतर शास्त्रीबोवांनी केसरी व मराठा हीं दोन वर्तमानपत्रे सन १८८१ च्या जानेवारीपासून सुरू केली. 'केसरी' चे संपादक आगरकर झाले व 'मराठा' पत्राचे संपादक टिळक झाले. 'आरंभी संकट येऊन कार्यकर्त्या माणसांची परीक्षा पाहण्यांत येते' असें म्हणतात तें खरें. कारण 'न्यू इंग्लिश स्कूल ',' केसरी' पत्र व 'मराठा' पत्र हीं सुरू होऊन कोठें एकदोन वर्षे होतात इतक्यांत १८८२ च्या मांच महिन्यांत सर्वांचे आधारस्तंभ असे विष्णुशास्त्री मरण पावले व कोल्हापूरच्या कारभान्यांनी 'केसरी' व 'मराठा' या पत्रांवर केलेल्या बेअब्रूच्या खटल्यांत आगरकर व टिळक यांना शिक्षा झाली. व त्यांना डोंगरविरील तुरुंगांत १०१ दिवस तुरुंगवास भोगावा लागला. हीं जरी दोन भयंकर संकटें आलीं तरी त्यांतून या तीनही संस्था उत्तम प्रकारें निभावून निघाल्या. याचे कारण आगरकर व टिळक यांवरील त्यांच्या मित्रांचें प्रेम व त्यामुळे त्यांनी केलेली मदत.