पान:महाराष्ट्राचे पंचप्राण.pdf/६९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(६४)

 गोपाळरावांचे एक बंधु संसार करावयाचा नाही असा निश्चय करून भगवीं वस्त्र धारण करून संन्यासी बनले. गोपाळरावांचा लो. टिळक यांनी वर्णिलेल्या कर्मयोगावर पूर्ण भरंवसा होता म्हणून ते संसारी बनले. पण जगाच्या हिताकडे पाहिले तर त्यांच्या बंधूंनीं भगवी वस्त्रे धारण करून जो संन्यास घेतला, त्यापेक्षां लग्न करून आपल्या अप्पलपोटेपणाचा संन्यास करून आपले गोपाळराव यांनी निरपेक्ष बुद्धीनें जो संसार केला तोच खरा स्वार्थसंन्यास म्हणजे उत्तम प्रतीचा संन्यास होय. याचमुळे वर जो आम्ही प्रश्न केला आहे कीं, हा गोपाळरावांचा संसार का संन्यास त्याचें उत्तर हा त्यांचा उत्तम संसार व म्हणूनच उत्तम संन्यास. असो, बाळांनों, हा विषय जरा कठीण आहे, यासाठी हा आपण येथेंच सोडून देऊं. गोपाळरावांच्या संसाराविषयीं एक दोन गोष्टी सांगून नंतर आपण त्यांच्या सार्वजनिक कामगिरीकडे वळूं. गोपाळरावांना अत्यंत सुशील व संसारदक्ष बायको मिळाली, यामुळे त्यांना गृहसुख चांगले मिळाले. त्यांना दोन मुलगेही झाले. ते दोन मलगे व गोपाळरावांची सुशील गृहिणी अकोला येथें रहातात. त्यांचे एक चिरंजीव अकोल्यास एका शाळेत शिक्षकाचें पवित्र कार्य करीत आहेत व दुसरे चिरंजीव तेथे एका गिरणींत एंजिनीअर आहेत. यशोदाबाई तेथेच चिरंजीवांजवळ रहातात.

जनसेवा.

 लो. टिळक व प्रि. आगरकर हे डेक्कन कॉलेजांत वर्गबंधु होते. दोघांनीही मिल्ल व स्पेन्सर यांचे ग्रंथ मनापासून वाचले. दोघांनाही त्यांतील तत्त्वें अतिशय आवडली. त्या ग्रंथांपासून लोककल्याण करण्याची बुद्धि व स्वातंत्र्यप्रेम दोघांच्याही मनांत उसले. म्हणून दोघांनी हातांत हात घालून असा निश्चय केला कीं, सरकारी नोकरींत हजारों रुपये मिळविण्यासाठी शिरावयाचें नाहीं, जाणून बुजून गरीबी करावयाची व जिवांत जीव आहे तोपर्यंत स्वतंत्रतेनें लोककल्याण व जनसेवा करावयाची असाहा पवित्र निश्चय या दोन थोर नररत्नांनी केला व तो मरेपर्यंत निष्ठापूर्वक पाळला. या त्यांच्या एकनिष्ठ सेवेनेंच ते या आपल्या