पान:महाराष्ट्राचे पंचप्राण.pdf/६८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(६३)

पुढील आयुष्यांत फारच थोडया विद्यार्थ्यांत दिसून येतो. याचे कारण ते खरे विद्यार्थी नसतात. तर ते नुसते परीक्षार्थी असतात. न्यायमूर्ति रानडे, मालाकार चिपळुणकर, देशभक्त आगरकर, लो. टिळक व भारतसेवक गोखल, हे खरे विद्यार्थी होते. ईश्वरा, असे खरे विद्यार्थी दरवर्षी शेंकडों निपजोत व या भारतभूमातेचा उद्धार करोत. असो. गोपाळराव सन १८८० सालीं एम्. ए. झाले.

हा संसार का संन्यास ?

 गोपाळरावांच्या विद्यार्थिदशेचें एवढा वेळ वर्णन झाले. आतां आमचे गोपाळराव संसारील त्याविषयींची थोडीशी हकीगत सांगतों. बी. ए. च्या वर्गात गोपाळरावांचे लग्न झालें. हल्लीं आपल्या इकडे लग्नाची चाल पूर्वीपेक्षां बरीच निराळी आहे. बराचसा हुंडा मिळाला का, काशींतील नवरदेव रामेश्वरच्या नवरीशी लग्न लावतो. पूर्वी असा प्रकार नसे. साधारण आपल्या गांवाजवळच्या गांवची मुलगी आपले मुलास करण्याची तेव्हां चाल असे. हेतु हा की, त्या मुलीची चालरीत व त्या कुटुंबाचें कुलशील आपणाला पूर्णपणे माहीत असावें. जवळच्या गांवची नवरा नवरी असली म्हणजे हें कांहीं कठीण नाहीं; पण तोच नवरा मुलगा दिल्लीचा व नवरी मद्रासची असें असलें म्हणजे सर्व माहिती सहज मिळते असें नाहीं. मग घाईघाईत पुष्कळ चुका होतात व मग सावकाशपणे सर्व जन्मभर पश्चात्ताप करण्यास चांगलेच सांपडतें. असो. सांगायचें तात्पर्य हेंच कीं, पूर्वी असे नव्हतें. गोपाळरावांचंच उदाहरण घ्या. त्यांची आई क-हाडची व बाप अगदीच शेजारी असलेल्या टेंभूगांवचा. त्याचप्रमाणें गोपाळराव टेंभूचे तर त्यांच्या नवरीचें गांव जवळच असलेले उंब्रण. उंब्रण येथें मोरभट फडके म्हणन एक सद्गृहस्थ रहात असत. त्यांच्या मुलीचें नांव अंबूताई. ह्या अंबूताईचें गोपाळरावांचे बरोबर गोपाळराव बी. ए. च्या वर्गीत असतांना लग्न झालें. अंबूताई सासरी आल्याबरोबर यशोदाबाई आगरकर बनल्या.