पान:महाराष्ट्राचे पंचप्राण.pdf/६७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(६२)

अभ्यास गोपाळरावांनी मन लावून केला, पण परीक्षेची वळ जवळ आली तरी परीक्षेची फी भरण्यास गोपाळरावांच्या जवळ पैसे नव्हते. ते पैसे मिळविण्यासाठी गोपाळरावांनीं एक नाटक लिहिण्याचा निश्चय केला. हें जेव्हां त्या वेळचे दयाळू प्रोफेसर के रूनाना छत्रे यांना समजलें तेव्हां त्यांना फार वाईट वाटलें व त्यांनी स्वतः गोपाळरावांची फी भरली व नाटक लिहिण्याच्या यातायातींतून त्यांना मुक्त केले. असले प्रेमळ प्रोफेसरांवर विद्यार्थ्यांचें अत्यंत प्रेम असावयाचेच हे सांगावयालाच नको. देव करो आणि असले प्रेमळ शिक्षक व तसेच प्रेमळ आज्ञाधारक शिष्य या आमच्या देशांत ऋषिकाळाप्रमाणे हल्लींही हजारों निपजोत. व गुरुशिष्यसंबंध अत्यंत पवित्र व प्रेमळ असा सदोदित राहो. अशा तऱ्हेनें संकटांशी झगडत गोपाळराव सन १८७८ सालीं बी. ए. ची परीक्षा उत्तम तऱ्हेनें पास झाले. यामुळे त्यांना डेक्कनकॉलेजांत फेलो नेमलें.
 आतां गोपाळरावांना थोडी स्वस्थता प्राप्त झाली. आतां फेलोला ५० रुपये दरमहा मिळतात त्याप्रमाणे त्यांना मिळू लागले, यामुळे पैशाची ददात राहिली नाहीं. आतां गोपाळरावांनी एम्. ए. च्या परीक्षेचा अभ्यास सुरू केला. गोपाळरावांनी एम. ए. साठीं तत्त्वज्ञान हा विषय घेतला होता. त्या विषयावरील जॉन स्टूअर्ट मिल नांवाच्या अत्यंत विशाल बुद्धीच्या पंडिताचे ग्रंथ त्यांनीं पुष्कळ लक्ष लावून वाचले. ह्या थोर मिलसाहेबांच्या अंगीं दोन फार उत्तम गुण होते. एक मनुष्यजातीचे हित करण्याविषयींची कळकळ व दुसरा न्याय व स्वातंत्र्य यांबद्दल निस्सीम प्रेम. हे साहेबांच्या अंगचे दोन उत्तम गुण त्यांचे ग्रंथ मनःपूर्वक वाचल्यानें गोपाळरावांच्या मनांत पूर्णपणें बिंबले व पुढे स्पेन्सर नामक उदार व हुषार पंडिताच्या ग्रंथांच्या वाचनानें ते त्यांच्या मनांत कायमचे रुजले. या थोर गुणांचा परिणाम गोपाळरावांनी यापुढे जीं जीं कामें केली त्यांत व त्यांच्या लेखांत स्पष्ट दिसून येतो. अशा तऱ्हेनें कॉलेजांत उत्तम ग्रंथ वाचल्यामुळे त्याचा कायमचा परिणाम