पान:महाराष्ट्राचे पंचप्राण.pdf/६६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(६१)
एकच सदरा.

 बाळांनों ' एकच सदरा' हा मथळा वाचून तुम्हांला 'एकच प्याला ' नाटकाची आठवण होईल. त्या नाटकांतील एकच प्याला नायकाच्या नाशास कारण झाला, पण आमच्या या चरित्रांत एकच सदरा हा आमच्या चरित्रनायकाची अब्रू राखण्यास व त्याला नांवालौकिकास चढविण्यास कारण झाला. बाळांनों, गोपाळराव कॉलेजांत गेले तेव्हां त्यांची इतकी गरीबी होती कीं, बिचाऱ्याला अंगांत घालावयाला एकच सदरा होता. तुमच्याप्रमाणे एक दोन शर्ट परटाकडे गेले आहेत, एक दोन खुंटीवर लोळत आहेत व एक कडकडीत इस्तरीचा अंगावर चढला आहे व याशिवाय ज्याकिटें अन् कोट नी पाटलोणी आहेत त्या निराळ्याच, अशी कांहीं गोपाळरावांची स्थिति नव्हती. त्यांचा एकच एक जिवलग सदरा होता. तेव्हां मळला असतां तो परटाकडे देणें अशक्य होतें म्हणून गोपाळराव रात्रीं सर्व रेसिडेन्सींतील मंडळी निजली म्हणजे आंघोळीच्या खोलींत जात. तेथें अंगांतील सदरा काढून स्वतः स्वच्छ धुवत, वाळवीत व तोच मग पुनः अंगांत घालीत. कोणही गरीबी ! देवा असला दुःखकारक प्रसंग कोणावरही न येवो! गोपाळरावांना ५०/६०रु. उसने मिळाले होते म्हणून सांगितलें; पण ते केव्हांच खलास झाले. आतां पैसे आणावे कोठून ही त्यांना पंचाईत पडली; तेव्हां त्यांनी पुण्यांतील वक्तृत्वोत्तेजक सभेतील एका विषयावर भाषण केले व त्या विषयाला नेमलेले ५० रुपयांचें बक्षीस मिळविलें. त्याचप्रमाणे एक उत्तम निबंध लिहिणाराला त्यांच्या कॉलेजांत ५० रुपयांचे बक्षीस लावले होते, तो निबंध त्यांनी लिहिला व ते ५० रुपयांचें बक्षीस मिळविलें. अशी कशी तरी धडपड करून व मेहनत घेऊन गोपाळराव कॉले खर्च कसा तरी भागवीत असत. या अतिशय मेहनतीचा गोपाळरावांच्या पीळदार शरीरावरही परिणाम झाला. त्यांची प्रकृति खराब झाली व त्यांचे आईला असलेला दम्याचा विकार त्यांना कायमचा जडला. एफ्. एच्या परीक्षेचा