पान:महाराष्ट्राचे पंचप्राण.pdf/६५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(६०)

मुलाच्या तोंडून असें धाडसाचें भाषण कधींच निघावयाचे नाहीं. कांहीं नुसत्याच बढाईखोर मुलांच्या तोंडून असें वाक्य कदाचित् निघेल. पण तें गोपाळरावांनी जसें खरें करून दाखविलें तसे त्यांच्या हातून कधींच व्हावयाचें नाहीं.
 असो. दरवर्षी वरच्या वर्गात जात जात सरतेशेवटीं गोपाळराव व त्यांचे मामा दत्तोपंत हे इसवी सन १८७५ सालीं मॅट्रिक्युलेशनचे परीक्षेत पास झाले. पुनः आतां पुढे काय करावें हा प्रश्न गोपाळरावांच्या पुढे उभा राहिला.

डेक्कन कॉलेजांत.

 मॅट्रिक झाल्यावर आतां आपण पुढे काय करावें हा प्रश्न गोपाळरावांपुढे उभा राहिला, म्हणून मार्गे सांगितलेंच आहे. त्या प्रश्नाचें उत्तर लगेच गोपाळरावांनी मनांत ठरवून टाकले, ते हें की ‘डेक्कन कॉलेजांत जावयाचें ' त्यांचे मामा दत्तोपंत हे त्यांच्याबरोबरच मॅट्रिक झाले. हे डेक्कन कॉलेजांत जाणार असें ठरलेंच होतें. आपण डेक्कन कॉलेजांत जाणार असें जेव्हां गोपाळरावांनी आपल्या मित्रमंडळीला सांगितले, तेव्हां त्या मंडळींत एकच हंशा पिकला. ते म्हणाले, या स्वारीला खास बेड लागलें आहे. स्वारींची गरीबी म्हणजे कोण ? मॅट्रिकपर्यंत मजल मारावयाला सांपडली हेंच आश्चर्य आणि स्वारी आतां मनोराज्य करावयाला लागली आहे कीं, आम्ही डेक्कन कॉलेजांत जाणार. फुकटचेंच असेल डेक्कन कॉलेजमधें जानें ! यांना खरोखर वेड्यांच्याच इस्पितळांत घातले पाहिजे. इतकी जरी मंडळीनी चेष्टा केली, तरी गोपाळरावांचा निश्चय ढळला नाही. त्यांनी आपली तयारी सुरू केली. त्यांचा बेत पक्का ठरला हे पाहून त्यांचे प्रेमळ गुरुजी रा. ब. महाजनी व दुसरे एक दोन सद्गृहस्थ यांनी त्यांना ५०-६० रुपये उसने दिले. ते घेऊन गोपाळरावजींनीं अकोले सोडलें, पुण्यास गेले, व त्यांनी डेक्कन कॉलेजांत आपलें नांव दाखल केलें.