पान:महाराष्ट्राचे पंचप्राण.pdf/६४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(५९)

सदाशिवराव भागवत यांचे घरीं अकोल्यास जावयास सांपडले. अकोल्यास गेल्यावर दत्तोपंत मामा व गोपाळराव भाचे अशी ही मामाभाच्यांची जोडी आनंदानें हायस्कुलांत शिकावयास जाऊं लागली. तेथें त्यांना नशिबानें अतिशय हुषार, रसिक, प्रेमळ व सुशील असे राव बहादूर विष्णु मोरेश्वर महाजनी हे हेडमास्तर लाभले. गोपाळराव स्वभावतःच चलाख पण जरासे तापट असे होते. त्यांना खोटें मुळींच खपत नसे. तसेंच आपले कांहीं एक मत ठाम असतां केवळ दुसऱ्याला खूष करण्याकरितां होस हो करण्याचा त्यांना अगीं मनापासून तिटकारा असे. यामुळे त्यांचे त्यांच्या शिक्षकांबरोबर वारंवार खटके उडत असत. अशा प्रसंगी रा. ब. महाजनी हे मध्यस्ती करून गुरुशिष्यांचा समेट घडवून आणीत असत.
 एकदां तर प्रत्यक्ष रा. ब. महाजनी यांचेशींच गोपाळरावांचा खटका उडाला. तो प्रसंग असा:- एक दिवस कांहीं कारणामुळे गोपाळरावांना शाळेत जाण्याला उशीर झाला. हे शाळेत उशिरां आलेले पाहून रा. ब. महाजनी म्हणाले 'हे कांहीं चांगलें लक्षण नाहीं. अशा रीतीनें आपण या मॅट्रिकक्लासांतच रखडत रहाणार ? ' हें भाषण का त्या मानी व तेजस्वी गोपाळरावांना खपणार ? त्यांनी गुरुजींना लगेच ताडकन् उत्तर दिले कीं ' येथें रखडण्याचें तर नांवच नको पण तुमच्यासारखा एम्. ए. होईन तरच नांवाचा आगरकर. ' हें उत्तर ऐकून एखादा दुसरा साधारण शिक्षक असता तर त्याला अति- शय संताप आला असता व त्यानें हा मुलगा उद्घट, अहंमन्य व बढाईखोर आहे, व यानें आपला अपमान केला असा समज करून घेतला असता. पण राव. ब. महाजनी हे उदार मताचे व सहानुभूतीनें विचार करणारे शिक्षक होते. यामुळे त्यांचें गोपाळरावांविषयीं वाईट मत तर झालेच नाहीं, पण उलट त्यांच्या आत्मविश्वासाबद्दल व त्यांच्या तेजस्वी व बाणेदार स्वभावाबद्दल त्यांना मोठे कौतुक वाटलें. अंगांत तशीच धमक व तेजस्विता असल्याशिवाय अत्यंत गरीबींतील