पान:महाराष्ट्राचे पंचप्राण.pdf/५९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रिन्सिपाल गोपाळ गणेश आगरकर.

 बाळांनो, आतां तुम्हांला एक तेजस्वी, निश्चयी, दीर्घोद्योगी, सत्यनिष्ठ देशभक्ताचें चरित्र सांगणार आहे. प्रसिद्ध संत तुकारामबोवा म्हणतात "निश्चयाचें बळ तुका म्हणे तेंचि फळ' हे म्हणणे ज्यानें खरें करून दाखविलें अशा धाडसी वीराचें चरित्र आतां मी तुम्हांला सांगणार. लहानपणीच वडील मरणें, घरची अन्नान्नदशा होणे, कोणाचाही आधार नसणे, अंगांत घालायला देखील एका सदस्याशिवाय दुसरें कांहीं नसणे, असल्या कितीही अडचणी आल्या तरी ज्याचें धैर्य खचलें नाहीं, इतक्या अडचणी आल्या तरी 'उत्तम विद्या मी मिळवीनच मिळवीन हा निश्चय ज्यानें तडीस नेला, तुमच्यासारखे मॅट्रिकचे वर्गातच रखडत बसणार असे गुरुजी म्हणतांच अंतस्थ तेजस्वितेने व पूर्ण आत्मविश्वासानें आपल्या गरीब स्थितींतही ज्यानें निश्चयानें, धैर्याने व स्पष्टवक्तेपणाने 'नाहीं गुरुजी, तुमच्यासारखा एम्. ए. होणार' असें ठांसून उत्तर दिले व तें हजारों अडचणींशीं व संकटांर्शी झगडून त्यानें खरें करून दाखविलें अशा कर्मवीराचें चरित्र आतां तुम्हाला ऐकावयाला सांपडणार. अठराविश्वे दारिग्रांत बाळपण गेल्यावर स्वतःच्या हिमतीवर अतिशय विद्वान् झाल्यावर, व सपाटून पैसे मिळण्याची संधि प्राप्त झाल्यावर, ती संधि कोण फुकट जाऊं देईल ? कोणीही जाऊं देणार नाहीं. पण ज्यानें अत्यंत गरिबींत अत्यंत विद्वान् होऊन अत्यंत श्रीमंत व सुखी होण्याची संधि आली असतां आपल्या देशबंधूंच्या शिक्षणासाठीं, देशसेवेसाठी त्या सोन्यासारख्या संधीला लाथ मारली व गरीबीला प्रेमानें मिठी मारली अशा एका थोर महात्म्याचें, अशा एका संताचें मी तुम्हाला चरित्र सांगणार आहें. ‘जें जें म्हणून मनाला सत्य म्हणून वाटेल तें तें देशहितासाठीं स्पष्टपणें सांगावें, मग तें लोकांना डो किंवा न आवडो'