पान:महाराष्ट्राचे पंचप्राण.pdf/५८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(५३)

आहे तेवढी पुरे, मूल नसले तरी चालेल. मला दुसरे लग्न बिलकूल करावयाचें नाहीं असे त्यांनी निक्षून सांगितलें.
 हल्लीं घरोघर बोकळलेल्या चहाचेही त्यांना व्यसन नव्हते. फार काय पण सुपारीचेही त्यांना व्यसन नव्हतें. नाही म्हणायला त्यांना एक व्यसन जबरदस्त होतें. त्या व्यसनाचा मात्र त्यांच्यावर पुरा पगडा बसला होता. त्या व्यसनापायीं पैशाचा व वेळाचाही, बराच चुराडा झाला. तें व्यसन कोणते म्हणाल तर पुस्तकांचें. विष्णुशास्त्रयांचे वडील जिवंत होते तोपर्यंत त्यांना आपल्या प्राप्तीपैकी संसाराकडे कांहींही यावें लागत नसे. असें होतें तरी स्वारीजवळ फारसे पैसे शिल्लक रहात नसत. केव्हांही स्वारी मुंबईस गेली की नवीन नवीन चांगली पुस्तकें खरेदी करण्यांत स्वारीचे पैसे हां हां म्हणतां उडून जावयाचे, इतकेंच नव्हे तर कोणी मित्र मुंबईस जाण्यास निघाला कीं, मुंबईहून खरेदी करून आणण्यासाठीं यांची नवीन पुस्तकांची यादी त्याचे जवळ जाव याचीच. याशिवाय जुनीं पुस्तकें सुंदर तऱ्हेनें बांधविण्यांतही त्यांचा बराच पैसा खर्च होत असे. आतां पुस्तकें आली की त्यांना दुसरे कांहीं सुचावयाचें नाहीं. सारा वेळ घरच्या लायब्ररींत तासचे तास बसून तें पुस्तक एकदांचें संपवावयाचें अर्से यांना पुस्तकांचें जबरदस्त व्यसन होतें. बाळांनो, या व्यसनामुळेच त्यांचें ज्ञान अतोनात वाढलें व ते इतके थोर ग्रंथकार व लेखक झाले. बाळांनों, विष्णुशास्त्रयांप्रमाणे सर्व दुर्व्यसनांपासून दूर रहा. विष्णुशास्त्रयांप्रमाणे चहापासून देखील दूर रहा. आणि बाळांनों विष्णुशास्त्र चांप्रमाणे पुस्तकांचें व्यसन लावून घ्या म्हणजे तुमचें कल्याण होईल. मात्र एक गोष्ट लक्षांत ठेवा की, पुस्तकांच्या व्यसनाप्रमाणेच व्यायामाचेंही व्यसन लावून घ्या म्हणजे तुम्ही दीर्घायु व्हाल व देशाचें पुष्कळ कल्याण कराल. बाळांनों, हें विष्णुशास्त्रयांचे सुंदर चरित्र नेहमीं आपल्या डोळ्यांसमोर ठेवा व त्यांच्याप्रमाणे देशाचें हित करण्यास झटा.