पान:महाराष्ट्राचे पंचप्राण.pdf/५६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(५१)

मानपत्रांच्या वाचनाचा त्यांना मुळींच नाद नव्हता. फार काय वर्तमानपत्रांत चाल विषयांवर काय रणें माजलीं आहेत इकडेही त्यांचें लक्ष नसे. ते केसरींत लेख लिहीत ते देखील मासिक पुस्तकास शोभतील असे असत. उदाहरणार्थ कालिदास श्रेष्ठ का भवभूति श्रेष्ठ, शाकुंतल परीक्षण, असल्या विषयांवर ते लिहीत. पुण्याचें ड्रेनेज, किंवा रस्त्यांचें नामकरण, 'रस्त्यावरील धूळ व ती नाहींशी करण्याचे उपाय ' किंवा मुंबईची मोडतोड' असल्या प्रचंड महत्वाच्या अग्रलेखांकडे ते कधींही लक्ष देत नसत. यामुळे एखादा मनुष्य असल्या चालू वर्तमानपत्री विषयांबद्दल त्यांचेजवळ बोलू लागला तर नुसतें 'हुं, हुं ' करण्यापलीकडे त्यांच्या तोंडांतून शब्दही बाहेर पडत नसे. सांगण्याचें तात्पर्यं हें कीं, सर्वकाळ सारखेच महत्त्वाचे असतील असेच विषय शास्त्रीबोवांना आवडत असत. दुसरा त्यांचे स्वभावाचा विशेष म्हटला म्हणजे स्वतःविषयीं व स्वतःच्या कृत्यांविषयीं विशेष अभिमान अथवा गर्वही म्हटले तरी चालेल. पण हा गुण चांगलाही आहे व वाईटही आहे. या अभियाना किंवा गर्वाने आत्मविश्वास वाढून यशस्वी कामगिरी हातून घडल्यास हा सद्गुण होतो. नुसत्या वल्गना करण्याकडे हा गुण लागल्यास त्याला दुर्गुण म्हणतात. मग ती शुद्ध बढाई होते. विष्णुशास्त्री यांचे आंगीं हा सद्गुण झाला. कारण या गुणानें त्यांचा आत्मविश्वास वाढून त्यांनी अलौकिक कामगिरी करून दाखविली. बाळांनो, यावरून आत्मविश्वास धरावा, पण व्यर्थ बढाई मारूं नये हें 'तुम्ही लक्ष्यांत ठेवाल तर तुमचें कल्याण होईल.

विष्णुशास्त्री यांची धर्ममतें.

 विष्णुशास्त्री यांचे धर्माच्या बाबतींतील विचार नवीन शिकलेल्या सुधारकांप्रमाणेच होते. म्हणजे, ब्रह्मा, विष्णु, शंकर वगैरे अनेक देव त्यांना संमत नव्हते. जेव्हां जेव्हां निबंधमार्लेत देवाविषयीं लिहिण्याचा प्रसंग येई, तेव्हां ते जगन्नियंता परमेश्वर, किंवा जगञ्चालक प्रभु असे लिहीत असत. शंकर किंवा विष्णु अशा नांवानें ते ईश्वराची प्रार्थना