पान:महाराष्ट्राचे पंचप्राण.pdf/५४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(४९)

रोज फोटोग्राफरला घरीं बोलावून बायकांचा फोटो काढविला व नंतर दुसरे दिवशीं विष्णुशास्त्री व त्यांचे मित्र लष्करांत फोटो काढविण्यास गेले. पहिल्यानें मित्र मंडळीसह शास्त्रीबोवांचा फोटो काढला, नंतर मंडळींचा आग्रह पडला कीं विष्णुशास्त्री यांचा एकट्याचाच उभे असलेला असा फोटो काढवावा. तेव्हां फोटो काढण्यासाठी ते उन्हांत उभे राहिले. फोटोग्राफर जरा नवशिका होता यामुळे त्यांना जरा जास्त वेळ उन्हांत उभें रहावे लागले. यामुळे त्यांना घेरी येऊन ते पडले. यामुळे त्यांच्या पुढील दांतांस व कानास इजा झाली. नंतर लगेच मित्रमंडळीसह ते घरीं परत आले. एक दोन दिवसांत झालेली इजा बरी झाली. पण त्यांना बारीक ताप येऊं लागला. त्यावर घरगुती इलाज त्यांनी केले. पण ताप थांबला नाहीं. त्या बारीक तापामुळे ते फार अशक्त झाले. बाहेरून पहाणाराला हे आजारी आहेत असे वाटत नसे, पण आंतून ते दिवसेंदिवस थकत चालले. त्यांत त्यांस शौचाला साफ होईना म्हणून औषध दिलें. तें लागू पडलें नाहीं व उलट त्यानें अंगाची अतिशय आग होऊं लागली. त्यामुळे त्यांनी कलिंगड आणवून त्याचा तुकडा खाल्ला. हें कपथ्य झाले. त्यांचा ताप फारच बाढला, त्यांना वायू झाला व कोणाचे कांहींही इलाज न चालून आपल्या या दुर्देवी महाराष्ट्राचा उद्धारक पंचप्राणाप्रमाणें प्रिय तेजस्वी सूर्य गुरुवार तारीख १७ मार्च १८८२ रोजी सर्व महाराष्ट्राला शोकसागरांत लोटून पहांटेस १५॥ वाजतांच अस्ताला गेला !
 विष्णुशास्त्रयांच्या मरणाची बातमी ऐकून सर्व पुणे शहर दुःखानें विव्हळ झालें. जो तो हातांतलें कामे टाकून मूढासारखा निश्चेष्ट झाला. शाळेतील लहान लहान मुलें सकाळी रस्त्यावर शाळेत जाण्या- साठीं येतांच त्यांना ही भयंकर बातमी समजली. त्याबरोबर बिचाऱ्यांना रडूंच कोसळलें. तरुण व म्हातारे पुरुष व स्त्रिया यांना आपला अगर्दी प्रिय नातेवाईक मेल्याप्रमाणें दुःख झालें.