पान:महाराष्ट्राचे पंचप्राण.pdf/४९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(४४)

 या निबंधमालेत मिशनरी मंडळी व कांही मोठे साहेब यांस आवडणार नाहीत असे विचार कित्येक निबंधांत आले होते. त्यावरून सौम्य शब्दांनीं थोर अधिकाऱ्यांनीं तुझी सरकारी नोकर आहां यामुळे "इतके कडक लिहूं नका असे विष्णुशास्त्र्यांना सांगितले. पण ते शास्त्रीबोवांनी मनावर घेतलें नाहीं. शेवटीं सुखाची व वाढत्या पगाराची दरमहा शंभर रुपयांची मानाची नोकरी सोडावी कीं निबंधमाला बंद करावी असा प्रश्न त्यांचे पुढे उभा राहिला. तेव्हां म्हणजे सन १८७९ साली निबंधमालवरील त्यांच्या प्रेमामुळे, व स्वतंत्रतेच्या आवडीमुळे विष्णुशास्त्री यांनी आपल्या नोकरीचा राजीनामा दिला.
 राजीनामा देऊन पुण्यास आल्यावर पुढे काय करावयाचें हें त्यांनी ठरविलेंच होते. त्यांचा सर्वात आवडीचा विषय म्हटला म्हणजे लहान मुलांना शिक्षण देणे. हे काम त्यांना सरकारी शाळेत त्यांच्या मनाप्रमाणे करतां येत नसे, कारण त्यांच्या आवडीचे विषय त्यांना शिकवावयास मिळत नसत. हे शिक्षणाचें आवडीचे काम आपण आतां हाती घ्यावें असे त्यांना वाटलें. हा त्यांचा विचार हां हां म्हणतां सर्व पुणे शहरांत सर्वांना लवकरच कळला. यामुळे १८७९ च्या नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यांत पुणे शहरांत जिकडे तिकडे ज्याच्या त्याच्या तोंडीं हा विषय झाला. पुण्यांतील विद्यार्थ्याचे विष्णुशास्त्र्यांवर अतोनात प्रेम होतें. याचे कारण विष्णुशास्त्र्यांचा सुस्वभाव, शिकविण्याची अतीशय आवड, विद्वत्ता, विद्यार्थ्यांविषय मनस्त्री प्रेम, स्वार्थत्याग व उदारपणा. या सर्व गुणांमुळे विष्णुशास्त्री नवीन शाळा काढणार ही बातमी समजतांच स्कॉलरशिप मिळविणारे हुशार विद्यार्थी देखील आपल्या शाळेतून नांव काढून विष्णुशास्त्र्यांची शाळा केव्हां निघते याची वाट पहात बसले. नवीन शाळेविषयीं इतका उत्साह यापूर्वी विद्यार्थ्यांत कधींच दृष्टीस पडला नाहीं.
 या नवीन शाळेचे काम शास्त्रीबुवांस मदत करण्यासाठी त्यांच्यासारखच स्वार्थत्यागी, युनिव्हर्सिटीत नांव मिळविलेले व अति-