पान:महाराष्ट्राचे पंचप्राण.pdf/४४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(३९)
विष्णुशास्त्री यांचे शाळसोबती.

 विष्णुशास्त्री यांचे बरोबर कॉलेजांत शिकत असलेल्या त्यांच्या मित्रांपैकीं बरेच विद्वान व सुप्रसिद्ध झाले. त्यांपैकीं विष्णुशास्त्रयांचे विशेष जिवलग मित्र म्हटले म्हणजे रा. ब. विष्णु मोरेश्वर महाजनी. हे विष्णुशास्त्रचांप्रमाणेच स्वभावाचे गोड, रसाळ, निगर्वी व मनाचे मोकळे असत. विष्णुशास्त्रयांच्या प्रमाणेच परीक्षेला नेमलेल्या पुस्तकांशिवाय इतर पुस्तकें वाचण्याकडे यांचाही फार ओढा होता. यामुळे “समानशीले व्यसनेषु सख्यं" या न्यायानें त्यांची व विष्णुशास्त्रयांची मैत्री जडली व ती शेवटपर्यंत कायम टिकली. त्यांचे दुसरे मित्र म्हटले. म्हणजे बापुसाहेब भाजेकर. हेही स्वभावाने चांगले होते. पण यांचा पोषाख डामडौलाचा असे. तसाच यांचा स्वभावही डौली असे. यांना इंग्रजी भाषा पोकळ डौलदार वापरण्याची फार हौस असे. म्हणजे शब्द मात्र मोटे मोठे पण अर्थाच्या नांवानें पूज्य.
 विष्णुशास्त्रयांचे तिसरे मित्र प्रो. केरूनाना छत्रे यांचे चिरंजीव कोंडोपंत. हे मोठे विनोदी व मोकळ्या मनाचे असल्यामुळे यांच्या संगतींत विष्णुशास्त्र्यांचा काळ फार मजेत जात असे.
 विष्णुशास्त्रयांचे चौथे मित्र कै. जनार्दन बाळाजी मोडक हे पुढें काव्येतिहाससंग्रह मासिक काढण्याचे काम विष्णुशास्त्री यांना पुष्कळ उपयोगी पडले. हे अबोल, थोडेसे भित्रे, पद्धतशीर अभ्यास करणारे, शांत व मनमिळाऊ असे होते. याच वेळीं सुप्रसिद्ध तेजस्वी व बाणेदार प्रो. जिनसीवाले हे या कॉलेजांत अभ्यास करीत असत. सर्व विद्यार्थ्यांपेक्षां यांची रहाणी अगर्दी निराळी असे. कॉलेजांत बहुतेक विद्यार्थी संध्या व सोंवळेंओवळें यांना फांटा देतात तसें यांचें नसे. हे कॉलेजांतही अत्यंत कडकपणे स्नान, संध्या, पूजा, पोथी व सोंवळेओवळें पाळीत असत. ह्यांच्या अलौकिक बुद्धिसामर्थ्यानें व अचाट वाचनानें यांची सर्व विद्यार्थी व प्रोफेसर यांचेवर विलक्षण छाप असे.