पान:महाराष्ट्राचे पंचप्राण.pdf/४२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(३७)

फार काय सांगावें, निश्चिंतपणें चैन करावी असा तो मंजेचा काळ. सर्व आयुष्यांत त्या काळाइतका सुखदायक काळ नाहीं. असे ते आनंदाचे दिवस विष्णुशास्त्र्यांना आतां लाभले. त्यांना कालेजमधें गेल्यापासून भाषाविषयाबद्दलच्या दोन स्कॉलरशिपा मिळत असत.
 विष्णुशास्त्री हे विद्यार्थिदशेत अतिशय अबोल असत. चारचौघे जम म्हणजे यांचे काम नेहमीं श्रोतेपणाचें. हे चारचौघांत बहुतकरून क्वचितच तोंड उघडीत. आपल्या खोलींत आपल्याच विचाराचा, व आपला अगर्दी जिवलग असा एखादा मित्र असला म्हणजे यांची कळी उमलावयाची. मग यांचा भाषणाचा ओघ सारखा आनंदानें झुळुझुळ तासचे तास वहात असावयाचा. मग त्या भाषणांत निरनिराळ्या पुस्तकांच त्यांच्या कर्त्यांचें परीक्षण चालावयाचें तर कधीं कधीं निरनिराळ्या अलीकडच्या माणसांच्यावर टीका चालावयाची. अशा वेळीं स्वारी बोलण्यात इतकी गढून जावयाची कीं, आपल्या खोलींत काळोख पडला आहे, बरीच रात्र झाली आहे, दिवा लावला पाहिजे, हे देखील स्वारीच्या ध्यानांत यावयाचें नाहीं.
 विष्णुशास्त्री यांचा दुसरा स्वभावविशेष म्हणजे हल्लींच्या विद्यार्थ्यांचे प्रमाणे नाटकें पहाण्याचे त्यांना व्यसन नव्हते. सिनेमा तर त्या वेळेला नव्हताच. त्यांना वाचनाशिवाय दुसरे कसलेच व्यसन नव्हतें. खेळाचेंही त्यांना व्यसन नव्हते. मात्र बरोबरीचे सोबती घेऊनजवळपासचीं रमणीय स्थळे पहाण्यास रमत गमत जावें या गोष्टीची त्यांना फार आवड असे.
 अभ्यासाविषयीं म्हटलें तर वेळापत्रकाप्रमाणे काटेतोल अभ्यास करण्याचे त्यांना कधींच जमत नसे. आपल्या आवडीच्या विषयांच्या वाचनांत तासचे तास जावयाचे व आवडत नसतील ते गणितासारखे विषय यांची हेळसांड व्हावयाची असें यांचें चालत असे; यामुळे ते एकदोनदां नापासही झाले. विष्णुशास्त्री रात्रीं कधींही अभ्यास करीत