पान:महाराष्ट्राचे पंचप्राण.pdf/४१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(३६)

पुष्कळ लाभले होते. यामुळे त्यांच्या अंगीं एकलकोंडेपणा कधीही आला नाहीं. मोठेपणीं चारचौघांना बरोबर घेऊन देशकार्य करण्याचें जें त्यांना साधलें त्याचे कारण लहानपणापासून चारचौघांत मिसळून रहाण्याची संवय हेच होय.

शिक्षण.

 आपले चरित्रनायक यांचे शिक्षण बाळांनों, तुमच्यापेक्षा अगदीं निराळ्या तऱ्हेनें झालें. तें कधीं सरकारी शाळेत तर कधी गावठी शाळेत याप्रमाणे चार पांच शाळांत झाले. त्यांचें इंग्रजी शिक्षण पुण्याच्या सरकारी हायस्कुलांत प्रिन्सिपाल कर्कहॅम व प्रि. वामन आबाजी मोडक यांचे नजरेखालीं झालें. वडिलांकडे संस्कृत व मराठी पुस्तकें नेहमीं परीक्षणासाठी येत त्यामुळे विष्णुशास्त्री यांना मराठी व संस्कृत पुस्तकें वाचण्याचा नाद फार लागला. त्याचप्रमाणे इंग्रजी पुस्तकें वाचण्याकडेही त्यांचा फार ओढा होता. यामुळे इंग्रजी, मराठी व संस्कृत या भाषांत ते अतीशय प्रवीण झाले. पण यामुळे त्यांचें गणित या विषयाचें ज्ञान कच्चें राहिलें व तो विषय त्यांना आवडेनासाही झाला. बहुतकरून बाळांनो, असें दृष्टीस पडतें कीं गणितांत हुशार त्यांना भाषाविषय नावडता व ज्यांना भाषाविषयाची आवड त्यांना गणित नावडतें. असो, हायस्कूल मध्ये चांगल्या गुरुजींच्या हाताखाली लक्षपूर्वक अभ्यास करून विष्णुशास्त्री आपल्या वयाचे सोळावे वर्षी म्हणजे इ. स. १८६६ साली मॅट्रिक्युलेशनची परीक्षा पास झाले. नंतर ते कालेजचा अभ्यास करण्यासाठी डेक्कन कालेजांत जाऊं लागले. बाळांनों, मनुष्याचे आयुष्यांत बाळ- पण हे तर मजेचें खरेंच, पण त्यांतही विद्यार्थिदशा फार बहारीची. पण त्या विद्यार्थिदशेतही कालेजमध्ये घालविलेली वर्षे तर फारच आनंदाचीं; प्रपंचाची काळजी नाहीं, उद्यां कसें होईल याची पंचाईत नाहीं, विद्येच्या आनंदांत यथेच्छ रमावें, खावें, प्यावें, धांवावें, खेळावें, हंसावें, भांडावें, वादविवाद करावे, क्रिकेट टेनिस वगैरेंचा यथेच्छ समाचार घ्यावा, पोहार्बे,