पान:महाराष्ट्राचे पंचप्राण.pdf/३९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(३४)

 या त्यांच्या निपुणतेमुळे इंग्रजी प्रोफेसर ग्रीन वगैरेंची त्यांचेवर मर्जी बसली. इंग्रजी व संस्कृत या दोनही भाषांत पारंगतता मिळविविल्यामुळे कृष्णशास्त्री यांची पंडितवर्गीत मोठी मानमान्यता झाली. यामुळे मराठी भाषेत उत्तम ग्रंथ लिहिण्याची योग्यता त्यांचे अंगीं आली. त्यांनी मराठीत पुष्कळ चांगली पुस्तकें लिहिलीं व तीं पंडितांना आणि सरकारला फार पसंत पडलीं.
 त्यांची अलौकिक बुद्धि व विद्वत्ता लक्षांत आणून सरकारनें त्यांना मोठमोठ्या पगाराच्या जागा दिल्या व शेवटीं तर त्यांना रिपोर्टर ऑन दि नेटिव्ह प्रेस ही अतीशय मोठी जागा दिली. कृष्णशास्त्री यांनीं बऱ्याच संस्कृत नाटकांची मराठी भाषांतरें शुद्ध केलीं, मराठी व्याकरणावर उत्तम निबंध लिहिले. याशिवाय अरबी भाषेतील सुरस चमत्कारिक गोष्टी, अनेक विद्यामूलतत्वसंग्रह, अर्थशास्त्र, परिभाषा, साक्रेटिसाचें चरित्र, रासेलसाचें चरित्र इत्यादि गद्यग्रंथ त्यांनी लिहिले आहेत. याशिवाय एक लहानसाच पण खुबीदार असा 'पद्यरत्नावलि ' नांवाचा काव्यग्रंथ त्यांनी लिहिला आहे. यांनी आपल्या परिश्रमांनीं मराठी भाषेला बरेंच चांगलें रूप दिले. अशा तऱ्हेनें त्यांचे चिरंजीव विष्णुशास्त्री यांचे कार्याचा त्यांनीं पाया घातला असे म्हणण्यास हरकत नाहीं.

चरित्रनायकाचें जन्म व बाळपण.

 वर सांगितलेंच आहे कीं, आपले चरित्रनायक विष्णुशास्त्री चिपळूणकर यांचा जन्म पुणे येथें तारीख २० मे १८५० रोजी झाला. हे लहानपण बरेच अशक्त असत. ह्यांचें बाळपण मोठें मजेत गेलें. याचीं बरीच कारणे आहेत. पण त्यांत मुख्य व पहिले कारण हें कीं, ते आपल्या बापाचे पहिलेवहिले चिरंजीव. पहिल्या मुलाचे लाड नवानवशाचा म्हणून फार होतात. हे बाळांनों तुम्हांला ठाऊक आहेच. दुसरे कारणयांचे आजोबा हरिपंत मामा व आजी भागीरथी मामी. बाळांना