पान:महाराष्ट्राचे पंचप्राण.pdf/३८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ३३ )

त्रिंबक क्षेत्र गेला. त्र्यंबकेश्वराजवळचे श्रीहर्ष किल्ल्याची फडणिशी त्या पुरुषाला मिळाली. नंतर ती सुटल्यावर त्या वंशांतले हरिपंत धाकटे बाजीरावांचे धाकटे बंधू चिमणाजीआप्पा यांचे शागीर्द झाले. इ० स० १८१८त पेशवाई बुडाली वबाजीराव आणि चिमणाजीआप्पा ब्रह्मावर्तास गेले. तेव्हां हरिपंत पुण्यासच राहिले व एका अफूचे दुकानावर आपलें पोट भरूं लागले. त्यांस १८२४ सनांत कृष्णशास्त्री झाले. हे कृष्णशास्त्री आपले चरित्रनायक विष्णुशास्त्री यांचे वडील. कृष्णशास्त्री अतिशय हुषार निघाले. ते मोरशास्त्री यांचेजवळ संस्कृत शिकत असत. त्यांची तीव्र बुद्धि पाहून मोरशास्त्री फार खूष झाले व कृष्णशास्त्री यांना ते बृहस्पती असें म्हणूं लागले. मोरशास्त्री फार दूरदर्शी होते. त्यांनी पाहिलें कीं, दिवसानुदिवस संस्कृत विद्या व संस्कृत पंडित यांची किंमत कमी होणार व इंग्रजी विद्या व इंग्रजी पंडित यांना सपाटून मान मिळणार. मोरशास्त्री यांचें आपले शिष्य कृष्णशास्त्री यांचेवर अगदी स्वतःच्या मुलासारखे प्रेम होतें. म्हणून आपल्या लक्ष्यांत आलेली गोष्ट त्यांनी कृष्णशास्त्री यांना सांगितली व त्यांचें मन वळवून ही गुरुशिव्यांची जोडी इंग्रजी शिकूं लागली. यावेळी मोरशास्त्री म्हातारे झाले होते तरी त्यांनी इंग्रजी शिकण्यास कंबर बांधिली ही गोष्ट घरगुती अडचणींत आमचें बरेंच वय फुकट गेलें व आतां आम्ही मोठे झालों, आतां आमचे जून मनांत विद्येचा प्रवेश होणार नाहीं असें म्हणणारे लोकांनीं ध्यानांत ठेवण्यासारखी आहे. मनुष्य कितीही म्हातारा झाला तरी कांहीं नवीन शिकण्यासारखे असल्यास त्यानें म्हातारपणाची सबब कर्धीही सांगू नये. तर तरुणाप्रमाणे एकदम नवीन विद्या शिकण्यास सुरवात करावी. कृष्णशास्त्रीदेखील या वेळेला लहान नव्हते. त्यांचें या वेळीं एकोणतीस वर्षांचें वय होतें. त्यांनी गुरुजींची हिम्मत व उदाहरण डोळ्यांपुढे ठेवून इंग्रजी शिकण्यास सुरवात केली. कृष्णशास्त्रयांची तीव्र बुद्धि जशी संस्कृत भाषा हस्तगत करण्यांत यशस्वी झाली तशीच ती इंग्रजी विद्येला काबीज करण्यासही समर्थ झाली.