पान:महाराष्ट्राचे पंचप्राण.pdf/३५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(३०)

जिक परिषदा भरवूं लागले, शेतकऱ्यांची उन्नति होण्यासाठी, शेतकऱ्यांची कर्जबाजारी दूर करण्याकरितां कायदा करविला, उद्योगधंद्यांची वाढ व्हावी म्हणून औद्योगिक परिषदा दरवर्षी भरवूं लागले, शिक्षणांतही सुधारणा केली, अशा सर्व दिशांनी त्यांनी देशसेवा केली. आपली विशाल, व्यापक व तेजस्वी बुद्धि, अगाध ज्ञान व मनमिळाऊपणा ही सर्व न्यायमूर्तींनीं स्वदेशसेवेस वाहिली होतीं. आपल्या देशाचें सर्व बाजूंनी पाऊल पुढें कसें पडेल याचीच ते रात्रंदिवस काळजी वहात असत. न्यायमूर्तीच्या अंगांतील एकेका गुणानें देखील मोठें पद प्राप्त होते. मग इतके सर्व गुण त्यांच्या आंग एकवटल्यावर व त्या सर्वोवर कळस करणारी साधुसंतांसारखी त्यांची मनोवृत्ति असल्यावर त्यांना हल्लींच्या काळचे संत, हल्लींच्या काळचे ऋषी कोण म्हणणार नाहीं ? सर्वच म्हणतील. नव्हे, संत संत म्हणून त्यांची सर्व लोक स्तुति करीत आहेतच व ती योग्यही आहे. असो. बाळांनों, या अर्वाचीन संतांचें अनुकरण करा व देशाला चांगले दिवस आणण्यासाठीं रात्रंदिवस झटा.