पान:महाराष्ट्राचे पंचप्राण.pdf/३१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(२६)

निघून मग इकडे आपण ते कितीतरी पट किंमत देऊन घेतों, असें करूं नये. येथेंच तेल काढण्याच्या गिरण्या काढाव्या. या त्यांच्या उपदेशाप्रमाणे हल्ली बऱ्याच ठिकाणी तीळ, जवस, एरंडी, सरकी वगैरे- पासून तेल काढण्याच्या मोठाल्या इंजिनाच्या मदतीने चालणाऱ्या गिरण्या निघाल्या आहेत. ही आनंदाची गोष्ट आहे. याचप्रमाणे ज्या पदार्थीपासून रंग तयार करतां येतात ते पदार्थ, विलायतेंत न पाठवितां इकडेच त्यांपासून रंग तयार करावे, असेही त्यांचें सांगणे होतें. त्याप्रमाणे होईल तर आपल्या देशाचा अतोनात फायदा होईल. तसेंच चिंध्यांपासून कागद, रसापासून साखर, कातड्यापासून बूट, येथेच तयार करावे, असे त्यांचे म्हणणे होतें. त्याप्रमाणें आतां हळूहळू होऊं लागले आहे. आतां आपला देश निव्वळ शेतीवर अवलंबून नाहीं. नवीन उद्योगधंदे व कारखाने झपाटयानें निघत आहेत. यामुळें, एकादे वर्षी पाऊस न पडला तर लोकांना कारखान्यांत काम मिळते. या सर्व गोष्टींवरून उद्योगधंद्याची भरभराट करावी, व नवीन धंदे काढावे असे लोकांच्या मनांत बिंबवून न्यायमूर्तींनी देशाची स्थिति सुधारण्यास किती मदत केली, हे बाळांनों, तुम्हांला समजलेंच असेल.

न्यायमूर्तीची सामाजिक कामगिरी

 आपल्या देशाची राजकीय स्थिति सुधारावी, आपल्याला राजकीय इक्क मिळावे, आपली धार्मिक उन्नति व्हावी, आपले देशबंधू धार्मिक व्हावे, आपला देश निरनिराळे जिन्नस उत्पन्न करणाऱ्या कारखान्यांनी गजबजून जावा अर्से ज्याप्रमाणे आपणाला वाटतें त्याचप्रमाणे आपल्या समाजांत ज्या वाईट चालीरीती व अनाचार शिरले असतील ते जाऊन आपल्या समाजाची स्थिति सुधारावी, आपला समाज ऋषिकाळांतील समाजाप्रमाणें तेजस्वी, ज्ञानसंपन्न व्हावा, ऋषिकाळीं जसे पुरुष मोठे ज्ञानी झाले होते, तसे हल्लींही पुरुष ज्ञानसंपन्न व्हावे, ऋषिकाळीं ज्याप्रमाणें स्त्रिया विद्वान् झाल्या होत्या तशा हल्लींही व्हाव्या, ऋषि-