पान:महाराष्ट्राचे पंचप्राण.pdf/३०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(२५)

मतलब हा, कीं हिंदुस्तानच्या दारिग्राचें कारण आळस व उद्योग धंद्याची हेळसांड हे आहे. न्यायमूर्ति माधवरावजी रानडे यांनी आपल्या देशाच्या दारिग्राबद्दल जेव्हां विचार केला तेव्हां ही गोष्ट त्यांच्या चटकन लक्षांत आली. लक्षांत आल्यावर स्वदेशप्रेमी माधवराव स्वस्थ थोडेच बसणार. त्यांनी लगेच बऱ्याच लोकांजवळ ही गोष्ट काढिली. या गोष्टीबद्दल सर्वत्र चर्चा चालू केली व अतोनात खटपट करून सर्व देशाचें इकडे लक्ष लागावें व सर्व देशानें उद्योगधंद्याची भरभराट करण्यास सुरवात करावी व झटावें म्हणून पहिली औद्योगिक परिषद सन १८९० त पुणे येथें भरविली. त्या वर्षापासून उद्योगधंद्यांतील लोकांची व त्यांबद्दल कळकळ बाळगणारांची औद्योगिक परिषद दरवर्षी भरूं लागली आहे. त्यामुळे देशांतील उद्योगधंदे सुधारण्याकडे पुष्कळ लोकांचे लक्ष गेलें आहे व पुष्कळ कारखाने निघून त्यांत कच्च्या पदार्थांपासून नवीन जिन्नस बनूं लागले आहेत. याचें सर्व श्रेय खरोखर न्यायमूर्तींनांच दिले पाहिजे. हिंदी सांपत्तिक शास्त्रावर न्यायमूर्ति माधवराव यांनी पुष्कळ उत्तम निबंध लिहिले आहेत. त्या निबंधांच्या वाचनानें स्वदेशबंधूंना धंदे भरभराटीस कसे आणावे, नवीन धंदे कोणते काढावे, ते कोठें काढावे, हे कळूं लागले आहे. हिंदुस्तानांत नैसर्गिक शक्तीवर चालणारे पुष्कळ धंदे सुरू करतां येतील, असें न्यायमूर्तींनीं इ० स० १८९० सालींच लोकांना सांगितले. हिंदुस्तानांत निरनिराळे धबधबे आहेत, त्यांपासून वीज उत्पन्न करून त्यावर मोठाले कारखाने थोड्या खर्चानें चालवितां येतील, असे त्यांनीं औद्योगिक परिषदेपुढें दिलेल्या व्याख्यानांत सांगितलें. तें किती खरें होतें हैं आज आपण टाटांच्या निरनिराळ्या कारखान्यांवरून पहात आहों. आज आपणांला जें दिसत आहे तें न्यायमूर्ति माधवरावांना तीस वर्षांपूर्वीच स्पष्ट दिसत होतें. केवढें हें बुद्धिसामर्थ्य !
 माधवरावांनी एका निबंधांत असे म्हटले आहे, की तीळ वगैरे गळितांची धान्ये आपण विलायतेला पाठवितों व त्यांचें तेल तिकडे