पान:महाराष्ट्राचे पंचप्राण.pdf/२९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(२४)

क्वचितच असेल. निरानैराळे धर्म, हिंदु, महंमदी, पारशी, जैन, बौद्ध, ख्रिस्ती, इत्यादि घ्या. त्यांचे उत्तम अनुयायी या देशांत एकत्र बंधुभावानें नांदत असलेले तुम्हांला दिसतील. नाहींतर इतर देशांत निरनिराळ्या पंथांत सारख्या मारामाच्या चालू असायच्या. देवानें हिंदुस्तानाला अशा तऱ्हेनें अगीं लाडका लेक केला. उलट इंग्लंडकडे पहा. त्या देशांतील जमीन म्हणजे शुद्ध खडक. तेथील लोकांना वर्षीत थोडेच दिवस स्वतःच्या देशांत पिकलेल्या धान्यांवर पोट भरतां येईल. बरें, हिंदुस्तानप्रमाणे तेथें सोनें, रुपें, हिरे, मोर्ती, पिकत असतील तर तेही नाही. तेथें फक्त लोखंड व कोळसे सांपडणार. आतां हें लोखंड व हे कोळसे खायला उपयोगी पडतील का ? मुळींच नाहीं. बरें; असे आहे तर मग हिंदुस्तान देश अतिशय संपत्तिवान, सुखी व इंग्लंड अतिशय दरिद्री व दुःखी असावयास पाहिजे. पण पाहू गेलें तर वस्तुस्थिति याच्या अगदी उलट आहे. म्हणजे इंग्लंड अत्यंत श्रीमान्, सुखी, प्रबळ व प्रभावशाली बनलें आहे व हिंदुस्तान अत्यंत भिकारी, दुःखी, दुर्बळ व दुबळा बनला आहे. बाळांनो, याचे कारण आतां मी तुम्हांला सांगतों. जगांत आपण पहातों, कीं ज्या मुलाचे आईबाप अतिशय लाड करितात तो अतिशय आळशी बनतो; व शेवटीं दरिद्री, दुःखी व दुबळा होतो. उलट ज्या मुलाला आईबाप कांहीं देत नाहीत व ज्याचे लाड करीत नाहींत तो मुलगा उद्योगी, धाडसी, चलाख, स्वावलंबी निपजतो व आपल्या उद्योगाच्या व हुषारीच्या जोरावर श्रीमंत, प्रबळ व सुखी होतो. तोच न्याय येथें लागू. आपल्या जगाचा बाप ईश्वर, त्यानें हिंदुस्तानचे केले लाड. त्यामुळे हिंदुस्तान पुरा आळशी बनला. त्यानें उद्योगधंद्याकडे बिलकूल लक्ष दिले नाही. त्याने स्वतःच्या सुपीक जमिनींत पिकणारें धान्य स्वतःला पुरून उरेल ते दुसऱ्या देशांत पाठविलें व त्याच धान्यापासून इंग्लंडसारखे खडकाळ देश उत्तम वस्तु बनवून हिंदुस्तानापासून त्या वस्तूंबद्दल दसपट किंमत घेऊं लागले. झालें यामुळे हिंदुस्तान दरिद्री व इंग्लंड श्रीमंत म्हणजे सांगण्याचा