पान:महाराष्ट्राचे पंचप्राण.pdf/२२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(१७)
नोकरी.

 अशा रीतीनें लोक व सरकार माधवरावांची विलक्षण बुद्धिमत्ता पाहून आश्चर्यचकित झाले. दोघांनाही असली अलौकिक बुद्धि आपल्या उपयोगीं पडावी असे वाटलें. माधवरावजी दोघांच्याही अतिशय उपयोगीं पडले व दोघांचेंही यामुळे त्यांच्यावर विलक्षण प्रेम जडलें. बाळांना, संस्कृत भाषेत 'नृपतिजनपदानां दुर्लभः कार्यकर्ता' असें एका कवीनें म्हटले आहे. त्याचा अर्थ एकाच मनुष्याच्या हातून राजा व प्रजा यांची सेवा होणें अतिशय कठीण' असा आहे. परंतु असल्या दुर्लभ माणसांपैकींच बाळांनों, आपले माधवराव होते म्हणूनच त्यांनी राजा व प्रजा या दोघांकडून धन्य धन्य म्हणवून घेतलें. असो. वर सांगितलेंच आहे, कीं माधवरावांची अलौकिक बुद्धि सरकारने आपल्या कामास उपयोगी पडावी असें मनांत आणले, आणि लगेच त्यांनी १८६६ सालीं माधवरावांची एकदम दोनशें रुपये पगारावर अॅक्टिंग मराठी ट्रॅन्स्लेटर या जागेवर नेमणूक केली. नंतर त्यांना अक्कलकोटच्या कारभान्याची जागा मिळाली. पण तेथून उचलून कोल्हापूर सरकारानें त्यांना आपलें मुख्य न्यायाधीश नमिलें. पुनः इंग्रज सरकाराने १८६८ सालीं त्यांना एल्फिन्स्टन कॉलेजांत ४०० रुपयांवर इंग्लिशचे प्रोफेसर नेमिले. हिंदी मनुष्याला इंग्लिशचा प्रोफेसर नेमणे म्हणजे कांहीं सामान्य गोष्ट नव्हे. अशा रीतीनें मुंबईस राहावयास सांपडतांच माधवरावांनी प्रोफेसरचें अवघड काम उत्तम तऱ्हेनें करूनशिवाय त्याच वेळीं अॅडव्होकेटच्या परीक्षेचा अभ्यास केला; व त्या परक्षितही त्यांनी उत्तम यश मिळविलें. वेळांत वेळ काढून अनेक कामें करण्याची माधवरावांची हातोटी बाळांनों, तुम्हीं नीट लक्ष्यांत ठेवा. म्हणजे आईनें कांहीं काम सांगितले, की आईच्या कामामुळे माझा अभ्यास बुडाला, , नंबर खाली गेला, परीक्षा नापास झाली, अशी कुरकूर तुम्ही कधींही करणार नाहीं. १८७१ पर्यंत मुंबईस ४०० रुपयांवर इंग्लिशचे प्रोफेसरचें काम केल्यावर त्यांची कायद्यांतील हुशारी लक्ष्यांत घेऊन