पान:महाराष्ट्राचे पंचप्राण.pdf/२०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(१५)
विलक्षण न्यायीपणाची गोष्ट.

 रानड्यांच्या कुटुंबांत दरवर्षी कोजागिरीला रात्री दोन वाजेपर्यंत मुलांना सोंगट्या खेळण्याची परवानगी होती. माधवरावाला नुकतेच सहावें वर्ष लागले होते त्या सुमारास कोजागिरी आली. त्या दिवशीं माधव व त्याची धाकटी बहीण दुर्गाताई हीं दोनच मुलें घरांत होतीं. त्या दोघांपैकीं दुर्गाताई ९ वाजतांच निजली. माधवाचें जेवण झाले व दरवर्षीप्रमाणें आपण आज सोंगट्या खेळत दोन वाजेपर्यंत जागावें असें त्याला वाटलें. म्हणून त्यानें सोंगट्या खेळावयास मागितल्या, तेव्हां आईनें विचारले; 'अरे तूं खेळणार कोणाबरोबर ? दुर्गादेखील निजली !' तेव्हां माधव म्हणाला " कोणीच खेळावयाला नाहीं तर मग मी आपला खांबाबरोबर खेळेन.' आणि खरोखरच स्वारीनें खांबाबरोबर खेळण्यास आरंभ केला. बाळांनों, तुम्ही म्हणाल हें कांहीं तरी सांगतां. खांब कसा खेळेल ? त्याला का हात आहेत ? हात नाहींत हें खरें. पण माधव पडला मोठा कल्पक. त्याने आपला उजवा हात खेळण्यासाठी खांबाला उसना दिला व आपला डाव माधव डाव्या हातानें खेळूं लागला. खांबाचा डाव माधव उजव्या हातानें खेळे व आपला डाव्या हातानें खेळे. शेवटीं खांबानें माधवावर दोन बिन तोडी दिल्या. खांब कांहीं बोलत नव्हता, तरी पण खांबाने आपला पराभव केला है माधवानें सर्वोचे जवळ कबूल केलें. असलाहा माधव मोठा न्यायप्रिय होता; म्हणूनच माधवाचे पुढें जगविख्यात न्यायमूर्ति माधवराव गोविंद रानडे बनले. पोराचे पाय पाळण्यांत दिसतात ते असे.

माधवाचा विद्याभ्यास.

 आपल्या वयाच्या चवदाव्या वर्षापर्यंत माधवानें कोल्हापुरासच अभ्यास केला. नंतर त्याला पुढील अभ्यासासाठी मुंबईस १८५६ सालीं ठेविलें. तेथें एल्फिन्स्टन इन्स्टिट्यूट नांवाची फारच उत्तम इंग्रजी शाळा.