पान:महाराष्ट्राचे पंचप्राण.pdf/१९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(१४)

असे. वय लहान असल्यामुळे दहा वाजेपर्यंत भूक फार लागत असे. यामुळे माधव घरीं येतांच भूकभूक करणार हें त्याच्या आईस ठाऊक असे. यामुळे माधवबाळासाठी त्याची आई दशमी करून ठेवीत असे. व माधव घरीं येतांच दशमीवर तूप घालून त्याला देत. एके दिवशीं नुकतें ताक केलें होतें. लोणी कढविलें नव्हतें, म्हणून आईनें दशमीवर लोणी घातले. झालें. गेली बाळाची मर्जी. माधव हट्ट धरून बसला, कीं रोजच्यासारखें पातळ तूप वाढ. 'तूप कढविलें नाहीं उद्यां वाढीन,' म्हणून आईनें पुष्कळ सांगितलें, पण नाहीं. तेव्हां आईनें तुपाच्या तांबलींत चमचाभर पाणी घालून ती चुलींत ऊन केली व तांबली दशर्माविर ओतली, त्याबरोबर याची समजूत होऊन यानें मुकाट्यानें दशमी खाल्ली. दशमीवर पाणी वाढलें हें कांहीं स्वारीच्या लक्षांत आले नाहीं. वासबीस कोण पहातो, कारण हे पडले एकमार्गी.

थाटामाटाचा तिटकारा.

 माधवराव नेहमी साधा पोषाख करीत व अगदी साधेपणानें रहात. त्यांना डामडौल किंवा नटवेपणाचा अगदी कंटाळा असे. हा गुण त्यांचे आंगीं अगदी लहानपणापासून होता. एकदां एका सणाला त्यांचे आईनें हें लहान बाळ म्हणून मोठ्या हौसेनें सोन्याचा गोफ, सोन्याची कडीं व हिन्याची आंगठी यांचे अंगावर घातली. हें स्वारीला बिलकूल आवडलें नाहीं. पण आईची अवज्ञा होईल म्हणून हें स्वारीनें कसें तरी सहन केलें. पण आपल्या गळ्यांतला गोफ कोणाला दिसूं नये म्हणून स्वारीनें त्यावरून धोतर गुंडाळलें, कडीं बंडीच्या बाहींत मागें सरकून ठेवलीं, व आंगठीचा हिरा पुढे वळवून हाताची मूठ वळवून आंगठी कोणालाही दिसूं नये अर्से केलें. वडील माणसांनीं हें पाहिलें व 'तूं असें कां बरें करतोस' असें विचारिलें, तेव्हां स्वारीने सांगितलें, 'आपल्या घरीं माधुकरी येतात त्यांना कुठें असतात दागिने, मग आपणच कशाला घालावे ?' किती ही साधेपणाची हौस !