पान:महाराष्ट्राचे पंचप्राण.pdf/१५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(१०)

च्या मांडीवर तें खेळत आहे, सृष्टिदेवीपासून तें दूर पळालें नाही. यामुळे या सृष्टिदेवीच्या बाळांना सृष्टिदेवी अतिशय बुद्धिवान् बनविते. बाळांनों, हे मी म्हणतों याला माझेजवळ भरभक्कम पुरावा आहे. आपले न्यायमूर्ति माधवराव हे याच सृष्टिदेवीच्या रम्य मोभारगांवच्या घराण्यांत झाले. आपल्या अलौकिक बुद्धीनें, लोकोत्तर स्वार्थत्यागानें, अत्यंत देशप्रेमानें लोकमान्य झालेले लो. बळवंतरावजी टिळक याच कोंकणांत रत्नागिरीस जन्मले. खरोखर असले नगरत्न निर्माण करून रत्नागिरीने रत्नांचा गिरी म्हणजे रत्नांचा पर्वत हे आपले नांव खरें करून दाखविलें. येथील सर्व परीक्षांत आपल्या बुद्धिवैभवाने पहिला नंबर पटकावून विलायतेत जाऊन सर्व जगांतील गणित्यांना जिंकून पहिला नंबर पटकावणारे सिनीअर रँगलर परांजपे याच कोंकणानें आपल्याला दिले आहेत. बाळांनों, अशीं उदाहरणें देत गेलों तर त्यांचाच एक ग्रंथ होईल. यासाठी एवढींच उदाहरणे देऊन आपल्या चरित्रनायकाकडे वळतो. आपल्या माधवरावांचें निपणजे भगवंतराव या मोभारगांवाहून पंढरपुराजवळ करकंब म्हणून गांव आहे तेथें येऊन राहिले. त्यांनी सुप्रसिद्ध देशभक्त नानाफडणीस यांचें भविष्य अगदीं बरोबर वर्तविले, यामुळे फडणीस नाना अगर्दी आश्चर्यचकित झाले. या भगवंतरावांना भास्कर नांवाचा मुलगा झाला. हे भास्करराव फार प्रामाणिक, बुद्धिवान्व शूर निघाले. त्यांनी मोठ्या शौर्याीनें पटवर्धनी सैन्यांत हुद्देदार होऊन एक किल्ला सर केला. या भास्कररावांच्या मुलाचें नांव अमृतराव. हेच आपल्या चरित्रनायकाचे आजोबा, या अमृतरावांनी आपल्या हुशारीनें पुणे जिल्ह्यांत मामलेदारीचा हुद्दा मिळविला. या अमृतरावांना चार मुलगे होते. त्यांची नांवें बळवंतराव, गोविंदराव, गोपाळराव, व विष्णुपंत. यापैकी गोविंदराव हे आपल्या चरित्रनायकाचे वडील. हे गोविंदरावही अतिशय करारी, हुषार व धर्मशील होते. ते आपल्या अंगच्या हुषारीनें चढतचढत कोल्हापूर सरकारचे