पान:महाराष्ट्राचे पंचप्राण.pdf/१२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(७)

आळंदी, रामदास स्वामिमहाराजांची परळी ऊंर्क सज्जनगड, देवांचं चिंचवड, सखारामबोवांचें कल्याणजवळचें कवाड व असलींच दुसरी क्षेत्र पहा. हीं पुण्यस्थळे पाहण्यास फार वेळ किंवा फार पैसा लागत नाहीं. व तीं प्रत्यक्ष पाहिलीं म्हणजे त्या त्या साधुपुरुषांचे सर्व चरित्र आपल्यापुढें उर्भे रहाते. येथील लोक त्या संतांच्या पुष्कळ गोष्टी आपणाला सांगतात. यामुळे आपले मन पुण्यमय होतें, पवित्र होतें, त्या संतांसारखें आपण व्हावें असें वाटतें. हा केवढा बरें फायदा ! आतां याला थोडासा खर्च होईल हें खरें. तुम्हांपैकीं कांहीं म्हणतील हा खर्च करणे आमच्या शक्तीच्या बाहेरचें आहे. पण मी अगर्दी नम्रपणानें बाळांनों, तुम्हाला विचारतों, कीं शरीरप्रकृति खात्रीनें बिघडविणारा रोजचा चहाचा एकच प्याला कां होईना तसला तो नुकसानकारक पेला घेण्याला व त्याच्या पाई दरमहा दोन रुपये डोईपटी भरण्याला मात्र तुम्हांला शक्ती आहे. नाहीं बरें ? कां बरें, आतां कां लाजलां ? असो. खरा प्रकार इतका चटकन तुमच्या लक्षांत आला हें खरोखर सुचिन्हच आहे. बाळांनों, तर मग याच तो चहाचा नाद टाकून व तो सोडल्यामुळे जे पैसे वांचतील, त्यांतले थोडे पैसे 'संतदर्शन फंड' असें जिच्यावर नांव आहे अशा एखाद्या घरीच तयार केलेल्या पेटीत टाका. त्याचप्रमाणें वडिलांनी किंवा नातलगांनी प्रेमानें खाऊसाठी दिलेले पैसे देखील याच पेटीत टाका म्हणजे शाळेला सुटी झाल्यावर संत- दर्शनासाठी तुम्हांला पुरेसे पैसे सहज त्या पेटींत सांपडतील. अशा तऱ्हेनें चहाचें व्यसन सुटल्यामुळे तुमची प्रकृति सुधारेल, शहरापासून दूर मोकळ्या हवेंतून प्रवास केल्यामुळे तुमचें शरीर जोमदार, निरोगी, काटक व सशक्त बनेल व संतांच्या दर्शनानें मन सुप्रसन्न व सद्गुणी बनेल. असो. बरेंच विषयांतर झालें, तेव्हां आतां मुख्य विषयाकडे वळूं. मी काय म्हणत होतों, कीं देव या कलियुगांतही दिसतो, मात्र आपण आपलें मन अतिशय पवित्र बनविलें पाहिजे. बाळांनों, ज्यांनी आपलीं मनें व शरीरें सुविचारांनीं, सत्कृत्यांनीं व सद्गुणांनीं अगदीं निर्मळ व