Jump to content

पान:महाराणी चिमणाबाई सयाजीराव गायकवाड.pdf/२३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 पडदा पद्धतीच्या परंपरावादी काळात स्त्रियांनी कृषी, कला, कारागिरी, लोकोपयोगी सेवाकामे, हॉटेल व्यवसाय इ. आर्थिक व्यवसायांशी परिचित होऊन त्यांचा स्वीकार करतानाच बौद्धिक क्षेत्रसुद्धा स्त्रियांनी आपलेसे केले पाहिजे अशी इच्छा या ग्रंथाच्या माध्यमातून त्या व्यक्त करतात. जगातील ७ खंडातील २९ देशांतील स्त्रियांच्या स्थितीशी तुलना करत स्वातंत्र्य प्राप्तीच्या आधी ३७ वर्षे भारतीय स्त्रियांच्या उत्कर्षाचा 'मार्ग' आखून देणाऱ्या या एकमेव ग्रंथाचे नावही स्त्रीप्रश्नांच्या अभ्यासकांना माहीत नाही. ही बाब धक्कादायक तर आहेच परंतु आपल्या चर्चाविश्वाला आत्मपरीक्षण करायला लावणारी आहे.

 १८८२ साली ताराबाईंनी ‘स्त्रीपुरुषतुलना' हा स्फोटक निबंध लिहून स्त्री शोषणाचा अध्याय लिहिला. त्यानंतर २७ वर्षांनी या ग्रंथाद्वारे चिमणाबाईंनी स्त्रियांच्या आत्मसन्मानाचा महामार्ग आखला होता.आजच्या स्त्रीवादी साहित्याला आत्मचिंतनाकडून आत्मटीकेकडे घेऊन जात असताना पुरुष द्वेषाची बाधा होऊ न देता समतावादी आणि प्रत्येक कालखंडात सुसंगत असा कृतिकार्यक्रम म्हणजे हा महाग्रंथ आहे. हे पुस्तक स्त्रियांसाठी बायबल समान आहे. परंतु दुर्दैवाने स्त्री मुक्ती चळवळीच्या इतिहासाने, इतिहास अभ्यासकांनी आणि महाराष्ट्राने आजअखेर महाराणी चिमणाबाईंची व त्यांच्या या ग्रंथाची दखल घेतली नाही.

महाराणी चिमणाबाई सयाजीराव गायकवाड / २३