पान:महाराणी चिमणाबाई सयाजीराव गायकवाड.pdf/२२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 जगातील स्त्रियांच्या स्थितीशी भारतीय स्त्रियांच्या स्थितीची तुलना करून लिहिलेला हा आजअखेरचा एकमेव ग्रंथ आहे. कारण ही तुलना करत असताना १०० संदर्भ ग्रंथांचा वापर केला आहे. त्याचप्रमाणे सर्व खंडातील स्त्रियांच्या दर्जाची प्रत्यक्ष पाहणी करून हा ग्रंथ लिहिला आहे. अशा प्रकारे सर्व जगातील स्त्रियांची प्रत्यक्ष पाहणी करून त्यांच्या स्थितीची भारतातील स्त्रियांच्या स्थितीशी तुलना या ग्रंथात केली आहे. अशा पद्धतीने जगात कोठेही चिमणाबाईंच्या अगोदर किंवा नंतर आजअखेर एकही ग्रंथ लिहिला गेला नाही. म्हणूनच जागतिक परिप्रेक्ष्यात विचार करता हा ग्रंथ एकमेवाद्वितीय ठरतो. या ग्रंथाचे लेखन चिमणाबाईंनी एस. एम. मित्रा या विद्वानाच्या सहकार्याने केले होते.

 सार्वजनिक जीवनातून स्त्रियांना वगळले जाण्याची कारणमीमांसा करतानाच त्यावरील उपाययोजना कशा प्रकारे लागू करता येतील याचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न चिमणाबाईंनी या ग्रंथात केला आहे. भारतातील अनेक प्रगतशील योजनांच्या अपयशाचे मुख्य कारण या योजनांमधील स्त्रियांचा अत्यल्प सहभाग हे असल्याचे प्रतिपादन चिमणाबाईंनी केले आहे. आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र होऊन कल्याणकारी सामाजिक कार्य करण्याची इच्छा असणाऱ्या स्त्रियांना उपयुक्त अनेक व्यावहारिक सूचना चिमणाबाईंनी या ग्रंथात केल्या आहेत.

महाराणी चिमणाबाई सयाजीराव गायकवाड / २२