राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय मानसन्मान
सयाजीराव महाराजांच्या 'वाटेने मार्गक्रमण करत स्त्री- उन्नतीसाठी कार्यरत राहिलेल्या महाराणी चिमणाबाईंना ३ ऑगस्ट १८९२ रोजी ब्रिटिश महाराणींनी 'Emperial Order of the Crown of India' या किताबाने सन्मानित केले. १९०६ मध्ये कलकत्ता येथील राष्ट्रीय काँग्रेसच्या दुसऱ्या हिंदी औद्योगिक परिषदेतील महिला विभागाच्या अध्यक्षा म्हणून चिमणाबाईंची निवड करण्यात आली होती. याच अधिवेशनाच्या सर्वसाधारण विभागाचे अध्यक्ष सयाजीराव महाराज होते. राजा आणि राणी पती-पत्नींना एकाच वेळी एखाद्या महत्त्वाच्या राष्ट्रीय परिषदेचे अध्यक्षपद सन्मानाने मिळण्याचा भारतातील हा एकमेव प्रसंग असावा.
१९२६ मध्ये त्या 'नॅशनल कौन्सिल फॉर वुमेन इन इंडिया' च्या अध्यक्ष झाल्या. पुढे महाराणींच्या स्वच्छ, स्पष्ट आणि अभ्यासू भूमिकेमुळे १९२७ ला पुण्यात भरलेल्या पहिल्या अखिल भारतीय महिला परिषदेचे अध्यक्षपद त्यांना सन्मानपूर्वक देण्यात आले. ज्या काळात स्त्रियांबद्दलच्या पारंपरिक धारणा आणि कल्पना समाजात दृढमूल झाल्या होत्या त्या काळात महाराणींनी अत्यंत आश्चर्यकारकरीत्या मुलींसाठी प्राथमिक शिक्षणाचा जोरदार पुरस्कार केला. बालविवाहाची प्रथा नाहीशी करावी याची जोरदार मागणी केली. या परिषदेमध्ये मिसेस कमलादेवी चट्टोपाध्याय यांनी महाराणी चिमणाबाईंच्या प्रगत