पान:महाराणी चिमणाबाई सयाजीराव गायकवाड.pdf/१७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

सांगू शकतील हे सयाजीरावांना ज्ञात होते. परंतु त्या काळात महिला डॉक्टरांची असणारी उणीव या कार्यात अडथळा ठरत होती. यावर उपाय म्हणून महाराजांनी 'लेडी सुपरिटेंडेंट' हे पद निर्माण केले. स्टेट जनरल हॉस्पिटलमध्ये या पदासाठी महिना ३०० रु. विद्यावेतन व त्यात वार्षिक १५ रु. ची वाढ निश्चित केली. त्याचबरोबर परिचारिकांच्या नेमणुकादेखील करण्यात आल्या होत्या.

 गरीब स्त्रियांना प्रसूतीच्या वेळी मदत करण्याच्या उद्देशाने १९०९ मध्ये आपल्या प्रथम पत्नींच्या स्मरणार्थ महाराजांनी ५०,०००रु. ची भरघोस देणगी दिली. ही देणगी आजच्या रुपयाच्या मूल्यात १२ कोटी ५० लाखांहून अधिक भरते. पुढे १९२३ मध्ये गर्भवती स्त्रियांसाठी ‘महाराणी चिमणाबाई प्रसूतिगृह व शिशुकल्याण संस्थेची स्थापना केली. या संस्थेने गर्भवती स्त्रियांना प्रसूतीसाठी सुईणींचा सल्ला घेण्याऐवजी हॉस्पिटलमध्ये येण्यासाठी उत्तेजन दिले. प्रसूतीनंतर व आजारपणातदेखील बाळाची व्यवस्थित काळजी कशी घ्यावी याविषयीचे प्रशिक्षण स्त्रियांना देण्यात आले. त्यावेळी अजून तीन शिशुसंगोपन केंद्रेही स्थापन करण्यात आली. त्याचबरोबर या संस्थेमार्फत शाळकरी मुलांची नियमित वैद्यकीय तपासणी करण्यात येऊ लागली. संस्थेने आई व मुलांना पैसे, दूध, कपडे आणि किराणा मालाचे वाटप केले. या संस्थेने प्रसूतीदरम्यान स्त्रिया आणि बालकांच्या होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण कमी करण्यात लक्षणीय यश मिळविले.

महाराणी चिमणाबाई सयाजीराव गायकवाड / १७