पान:महाराजा सयाजीराव - स्त्रीविषयक कार्य.pdf/२१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 महिलांनी आपल्या बंदिस्त जीवनक्रमातून थोडासा वेळ काढून करमणूक, व्यायाम आणि खेळ यात आपला वेळ घालवावा यासाठी १४ फेब्रुवारी १९३७ ला 'महिला क्रीडा मंडळ' सुरू करण्यात आले. या क्रीडा मंडळाच्या माध्यमातून स्त्रियांना योगा, लाठी, लेझीम यासारख्या मैदानी खेळांचे प्रशिक्षण दिले जात असे.
स्त्रीविषयक कायदे
 रूढी परंपरांच्या विळख्यात अडकलेल्या स्त्रियांना मुक्त करण्यासाठी सयाजीरावांनी कायदेशीर तरतुदींचा मार्ग स्वीकारला. भारतीय समाजपरंपरेने स्त्रियांना नाकारलेले अनेक अधिकार सयाजीरावांनी कायद्यांच्या माध्यमातून आपल्या संस्थानातील स्त्रियांना बहाल केले. पतीच्या मृत्यूनंतरही स्त्रियांना आपले जीवन सामान्य स्त्रीप्रमाणे जगता यावे यासाठी सयाजीरावांनी १९०१ मध्ये ब्रिटिश भारतातील विधवा विवाह कायद्याच्या धर्तीवर बडोद्यात विधवा पुनर्विवाहाचा कायदा केला.

 फुलेंनी १८८४ ला मुंबई सरकारकडे बालविवाह प्रतिबंधक कायदा करून बालविवाह लावणाऱ्या दोन्ही पक्षातील पालकांकडून दंड वसूल करावा व तो दंड बहुजनांच्या शिक्षणासाठी खर्च करण्याची मागणी केली होती. ही मागणी करत असतानाच अशा प्रकारचा कायदा करण्याची दृष्टी संपूर्ण भारतात फक्त सयाजीरावांकडे असल्याचे मत त्यांनी नोंदवले

महाराजा सयाजीराव : स्त्रीविषयक कार्य / २१