पान:महाराजा सयाजीराव - स्त्रीविषयक कार्य.pdf/२०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

बालसप्ताह
 आई व बालकाचे आरोग्य उत्तम असणे राष्ट्राच्या विकासातील अत्यंत महत्त्वपूर्ण बाब असल्याने सयाजीरावांनी माता व बालकांच्या आरोग्यासाठी जे जे करता येईल ते सर्व केले. याचे उत्तम उदाहरण म्हणजे माता आणि बाल आरोग्य संवर्धनाच्या दृष्टिकोनातून बडोद्यात झालेला 'बाल सप्ताह’(Baby Weak) होय. भारतातील पहिल्या 'बाल सप्ताह' आयोजनाचे श्रेय बडोदा संस्थानला जाते. १ ते ६ फेब्रुवारी १९२४ दरम्यान बडोद्यात आयोजित केलेल्या बाल सप्ताहामध्ये मातेचे आरोग्य व बालकांचे संगोपन या विषयाशी संबंधित निबंध स्पर्धा तसेच 'महिला आणि बालकल्याण' या विषयावरील पोस्टर प्रदर्शन भरविले होते.
महिला बचत गट

 आर्थिक सबलीकरणाबरोबर महिलांना काटकसरीची सवय लागून महिलांची उन्नती व्हावी यासाठी सयाजीरावांनी १९३१ मध्ये महिलांच्या काटकसर संस्थांची (म्हणजेच बचत गटांची ) स्थापना केली. भारतातील बचत गट चळवळीचा हा आरंभ बिंदू होता. स्थापनेच्या वर्षी संपूर्ण बडोदा संस्थानात ११ तर १९३८-३९ मध्ये ५५ महिला काटकसर संस्था कार्यरत होत्या. बांग्लादेशातील अर्थशास्त्रज्ञ आणि बचत गट चळवळीच्या कामाची दखल घेऊन २००६ मध्ये ज्यांना नोबेल पुरस्कार दिला गेला त्या महंमद युनूस यांच्या अगोदर ५० वर्षे सयाजीरावांनी बडोद्यात हा प्रयोग यशस्वी केला होता.

महाराजा सयाजीराव : स्त्रीविषयक कार्य / २०