पान:महाराजा सयाजीराव - स्त्रीविषयक कार्य.pdf/१९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 महाराणी हायस्कूलच्या मुख्याध्यापिका श्रीमती झवेरी यांनी ८ एप्रिल १९२१ रोजी भगिनी समाजाची स्थापना केली. १९२७ साली बडोद्यात जेव्हा पुराने मोठी हानी झाली, तेव्हा भगिनी समाजाने पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मोठी रक्कम जमा करून पूरग्रस्त गरिबांच्या घराघरात जाऊन ती मदत पोहोचविली. १९२३ मध्ये बडोदा कॉलेजच्या एका खोलीत 'महाराणी चिमणाबाई महिला पाठशाळे'ची स्थापना करण्यात आली. या संस्थेने तब्बल ४० वर्षे स्त्रियांना देशी भाषेत शिक्षण देण्याचे कार्य केले. या पाठशाळेत तत्त्वज्ञान, समाजशास्त्र, मानसशास्त्र, जीवशास्त्र, आरोग्यशास्त्र इ.स्त्रियांना उपयुक्त ठरणारे महत्त्वाचे विषय देशी भाषांतून शिकविले जात.

 सयाजीरावांनी आपल्या आरोग्यविषयक धोरणात स्त्रियांच्या आरोग्यविषयक सुधारणांना अग्रक्रम दिला होता. गरीब स्त्रियांना प्रसूतीवेळी मदत करण्याच्या उद्देशाने १९०९ मध्ये आपल्या प्रथम पत्नींच्या स्मरणार्थ महाराजांनी ५०,००० रु. देणगी दिली. ही देणगी आजच्या रुपयाच्या मूल्यात १२ कोटी ५० लाख रुपयांहून अधिक भरते. पुढे १९२३ मध्ये गर्भवती स्त्रियांसाठी 'महाराणी चिमणाबाई प्रसूतिगृह व शिशुकल्याण संस्थेची स्थापना केली. या संस्थेने गर्भवती स्त्रियांना प्रसूतीसाठी सुईणींचा सल्ला घेण्याऐवजी हॉस्पिटलमध्ये येण्यासाठी उत्तेजन दिले. या संस्थेने प्रसूतीदरम्यान स्त्रिया आणि बालकांच्या होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण कमी करण्यात लक्षणीय यश मिळविले.

महाराजा सयाजीराव : स्त्रीविषयक कार्य / १९