पान:महाराजा सयाजीराव - स्त्रीविषयक कार्य.pdf/१६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

राष्ट्रीय कॉंग्रेसच्या दुसऱ्या हिंदी औद्योगिक परिषदेतील महिला विभागाच्या अध्यक्षा म्हणून चिमणाबाईंची निवड करण्यात आली होती. याच अधिवेशनाच्या सर्वसाधारण विभागाचे अध्यक्ष सयाजीराव महाराज होते. राजा आणि राणी पती-पत्नींना एकाच वेळी एखाद्या महत्त्वाच्या राष्ट्रीय परिषदेचे अध्यक्षपद सन्मानाने मिळण्याचा भारतातील हा एकमेव प्रसंग असावा.

 १९११ मध्ये महाराणी चिमणाबाईंनी भारतीय स्त्रियांच्या स्थितीची जगातील ७ खंडातील २९ देशांमधील स्त्रियांच्या स्थितीशी तुलना करणारा 'The Position of Women in Indian Life' हा महत्त्वपूर्ण ग्रंथ लिहिला. हा ग्रंथ भारतीय स्त्रियांना अर्पण केला असून तो लंडनमधून प्रकाशित झाला होता. हा ग्रंथ म्हणजे महाराजांच्या प्रेरणेने विकसित झालेल्या चिमणाबाईंच्या व्यक्तिमत्त्वाचा परमोच्च बिंदू होता. परदेश प्रवासावेळी महाराज आपल्यासोबत चिमणाबाईंनाही घेऊन जात. १९९४ मध्ये महाराणींनी स्वतःहून पडदा पद्धतीचा त्याग केला. चिमणाबाई पडदा पद्धतीचा त्याग करणाऱ्या राजघराण्यातील पहिल्या महिला होत्या. १९२७ मध्ये पुण्यात भरलेल्या पहिल्या अखिल भारतीय महिला परिषदेचे अध्यक्षपद त्यांना सन्मानपूर्वक देण्यात आले. हे अध्यक्षपद जसे चिमणाबाईंच्या कामाचा गौरव करणारे होते त्यापेक्षाही अधिक महाराजांनी महिलांविषयक केलेल्या सुधारणा, कायदे आणि उपक्रम यांच्या प्रेरणेतूनही होते.

महाराजा सयाजीराव : स्त्रीविषयक कार्य / १६