पान:महाराजा सयाजीराव - कृतीशील सत्यशोधक.pdf/२१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 गायकवाडी आश्रय, घोल्याची नजर ॥ होती अनिवार ॥ फी न घेतां ॥ १ ॥ गा. ॥ धृ.॥
 दुष्ट रोगांतून फुल्या वांचविला ॥ आनंदी पत्नीला ॥ केली ज्याच्या ॥ २ ॥
 महात्मा फुल्यांची सर्वात महत्त्वाची लेखनकृती असणारा 'सार्वजनिक सत्यधर्म' या पुस्तकाच्या शेवटी सयाजीरावांबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना महाराजांचा उल्लेख फुले 'सद्सदविचारसंपन्न' असा करतात. यावरून फुल्यांच्या जीवनात सयाजीरावांचे स्थान काय होते हे लक्षात येते.

 १८९० मध्ये फुल्यांच्या मृत्यूनंतर सावित्रीबाई आणि यशवंत यांना अत्यंत हलाखीत दिवस काढावे लागत होते. मामा परमानंदांच्या विनंतीवरून महाराजांनी सावित्रीबाईंच्या मदतीसाठी धामणस्करांच्या हस्ते एक हजार रुपयांचा चेक पाठवून दिला असे १०-२-१८९२ च्या धामणस्करांनी मामांना लिहिलेल्या पत्रावरून कळते. हा चेक मामांचे स्नेही तुकाराम तात्या भागीदार असणाऱ्या एस. नारायण कंपनीत ठेवून त्या रकमेच्या व्याजातून दर तिमाहीस सावित्रीबाईंना ५० रु. मदत मिळण्याची व्यवस्था झाली. या ठेवीची पावती सावित्रीबाईंकडे ठेवण्याचा हुकूम महाराजांनी धामणस्करांना दिल्याप्रमाणे रजिस्टर पत्राने ती सावित्रीबाईंकडे पाठवण्यात आली.

महाराजा सयाजीराव : कृतीशील सत्यशोधक / २१