पान:महाराजा सयाजीराव - कृतीशील सत्यशोधक.pdf/२०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

राग मानू नये. बैलावर साखरेची अगर मातीची गोणी घातली तरी त्याला सारखीच, त्याप्रमाणे भिक्षुकवर्गाची स्थिती झाली आहे. भिक्षुकांचे नुसते पोपटपंचीचें ज्ञान बिलकूल उपयोगाचे नाही. असा श्रेष्ठ वर्ग जर अडाणी राहिला तर देशाचे कोणत्याहि प्रकारे कल्याण होणार नाही. सुशिक्षित शास्त्री संस्कृत पाठ म्हणू शकतात; परंतु मातृभाषेत आपले विचार त्यास सांगता येत नाहींत. धर्माचा उपदेश देणारे लोक चांगले समजदार असले पाहिजेत. जुने रिवाज मोडणे शक्य व कायदेशीर असेल तर राजाने धैर्याने त्यात फेरफार केला पाहिजे.” सयाजीरावांचे हे भाषण वाचत असताना तुकाराम महाराजांच्या 'वेदांचा तो अर्थ आम्हासीच ठावा | येरांनी वाहावा भार माथा ||' या ओळींची आठवण होते.
फुले दांपत्याचा आधारवड

 पक्षाघाताच्या पहिल्या आजारपणात उपचारासाठी सयाजीरावांनी फुल्यांना आर्थिक मदत केली. या आजारात उजवा हात पक्षाघाताने निकामी झाल्यामुळे डाव्या हाताने फुल्यांनी ' सार्वजनिक सत्यधर्म' हा महत्त्वाचा ग्रंथ लिहिला. या ग्रंथाच्या शेवटी फुल्यांनी या आजारपणातून वाचण्यासाठी ज्यांनी मदत केली त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणारा एक अखंड लिहिला आहे. त्या अखंडाच्या पहिल्या दोन ओळी महत्त्वाच्या आहेत. या अखंडाची सुरुवातच सयाजीरावांच्या उल्लेखाने झाली आहे. त्या ओळी पुढीलप्रमाणे-

महाराजा सयाजीराव : कृतीशील सत्यशोधक / २०