पान:महाराजा सयाजीराव - कृतीशील सत्यशोधक.pdf/१९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

देऊन जातीजातीमधील उच्चनीचपणा कमी केला. जगभर धर्म आणि पुरोहित वर्गाचे वर्चस्व असताना पुरोहितांकडून होणाऱ्या शोषणातून लोकांची मुक्तता करणारा पुरोहित कायदा हा भारतातीलच नव्हे तर जगातील अशा प्रकारचा पहिला कायदा होता जो आजच्या क्रांतिकारक बदलाच्या कालखंडातही भारताला करणे शक्य नाही.
 महात्मा फुल्यांच्या धर्मचिकित्सेची आणि सांस्कृतिक बंडाची 'तुलना सयाजीरावांच्या फक्त या एका कायद्याशी केली तरी सयाजीरावांचे फुले विचाराच्या विकासाला असणारे योगदान स्पष्ट होते. फुले आणि सयाजीराव यांनी केलेल्या पुरोहितशाहीच्या 'शवविच्छेदना'च्या पार्श्वभूमीवर १९०७ मध्ये भोर संस्थानात केलेले भाषण महत्त्वाचे आहे. हे भाषण ऐकायला जर फुले हजर असते तर तेसुद्धा सयाजीरावांपुढे नतमस्तक झाले असते एवढी रोखठोक भूमिका या भाषणात सयाजीराव घेताना दिसतात. सयाजीरावांनी ८ सप्टेंबर १९०७ मध्ये भोर संस्थानाला भेट दिली.

 त्यावेळी केलेल्या भाषणात सयाजीराव म्हणतात, "ब्राम्हण विद्वान आहेत; पण देशाची सुधारणा होणे असेल तर ब्राह्मणांच्या विद्वत्तेबरोबर त्यांचे विचारही सुधारले पाहिजेत. ब्राम्हण- भिक्षुकवर्ग यांचे कर्तव्य किती महत्त्वाचे आहे याचा विचार करा. परंतु ते आपल्यावरील जबाबदारी ओळखीत नाहीत, ही गोष्ट फार वाईट आहे. मी खरे आहे ते बोलतो याचा कोणी

महाराजा सयाजीराव : कृतीशील सत्यशोधक / १९