पान:महाराजा सयाजीराव - कृतीशील सत्यशोधक.pdf/१८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

बाब म्हणून मान्यता दिलेल्या व्यक्तीस संस्थानाकडून परवाना मिळाल्यावरच पौरोहित्याचा अधिकार प्राप्त होत होता. या निकषात न बसणारा पुरोहित धार्मिक विधी करत असल्यास त्याला २५ रु. पर्यंत दंडाची तरतूद होती. पण पुरोहित उपलब्ध नसल्यास सवलत दिली जात होती. तसेच पौरोहित्याचा हक्क प्राप्त झालेल्या पुरोहितास सहा वर्षातून एकदा पुरोहित परीक्षा पास होणे बंधनकारक होते. ही परीक्षा पास होणाऱ्या सर्व हिंदूंना मग त्यांची जात कोणतीही असो त्याला ही परीक्षा पास झाल्यावर पौरोहित्य करता येत होते. ही बाब २००० वर्षांच्या हिंदू धर्म-संस्कृतीच्या इतिहासातील एक मोठी क्रांती होती. परंतु हिंदू धर्म अभ्यासाच्या इतिहासात या कायद्यावर एक शब्दही लिहिला गेला नाही. नंतर ही मर्यादा ३ वर्षांवर व शेवटी दरवर्षी परीक्षा पास होऊन परवाना घेणे बंधनकारक करण्यात आले. पारंपरिक पुरोहितांना हा कायदा लागू झाल्यानंतर ६ वर्षाच्या आत ही परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक होते.

 या कायद्याने स्वातंत्र्यपूर्व काळात पूजा, धार्मिक कार्य करणाऱ्या पुरोहितांसाठी परवाना पद्धत सुरू केली. पुरोहितांनी पूजेवेळी केल्या जाणाऱ्या मंत्रपठणातील मंत्राचा अर्थ यजमानांना समजून सांगणे बंधनकारक केले. पुरोहित व्यवसाय वंश परंपरेऐवजी गुणवत्तेवर असावा म्हणून परीक्षा पद्धतीद्वारे ज्ञान तपासण्याची व्यवस्था करून ब्राह्मण जातीची पुरोहित मक्तेदारी नष्ट केली आणि ब्राह्मणेतर सर्व हिंदू जातींना पुरोहिताची संधी

महाराजा सयाजीराव : कृतीशील सत्यशोधक / १८