पान:महाराजा सयाजीराव - कृतीशील सत्यशोधक.pdf/१४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

'सकारात्मक' झाली असती. ती आपल्या उद्दिष्टाच्या अधिक जवळ गेली असती.
 १८८२ ला ज्याप्रमाणे फुल्यांच्या मागणीला पुढे नेणारे शैक्षणिक काम सयाजीरावांनी सुरू केले. १८८४ ला फुल्यांनी मुंबई सरकारकडे बालविवाह प्रतिबंधक कायदा करण्याची मागणी केली होती. त्याचप्रमाणे बालविवाह करणाऱ्या दोन्ही पक्षातील पालकांकडून दंड वसूल करावा आणि हा दंड बहुजनांच्या शिक्षणासाठी खर्च करावा हा मुद्दाही या मागणीत होता. सयाजीरावांनी फुल्यांच्या मागणीनंतर ४ वर्षांनी १४ जुलै १८८६ ला सर इलियट यांना लिहिलेल्या पत्रात बालविवाह प्रतिबंधासाठीच्या उपाययोजनांचा निश्चय केल्याचे लिहिले आहे. पुढे १९०४ मध्ये सयाजीरावांनी बडोद्यात बालविवाह प्रतिबंधक कायदा लागू केला. हा कायदा फुल्यांच्या मागणीला सुसंगत होता. पण येथेही महाराजांनी फुल्यांच्या पुढे एक पाऊल टाक होते. फुल्यांनी बालविवाह करणाऱ्या वधू आणि वर पक्षाला दंड करावा अशी मागणी केली होती.

 पण महाराजांनी मात्र वधू आणि वर पक्षाबरोबर लग्न लावणाऱ्या भटजीलासुद्धा दंड आणि शिक्षेच्या तरतुदीत आणले होते. ५० रु. दंड किंवा १ महिन्याचा तुरुंगवास असे या शिक्षेचे स्वरूप होते. पुढे १९३७ मध्ये दंडाची रक्कम ५० रु. वरून १००रु. झाली. ही दंडाची रक्कम आजच्या रुपयाच्या मूल्यात १ लाख ५७ हजार रु.हून अधिक भरते. फुले हे भारतातील पुरोहितशाहीचे

महाराजा सयाजीराव : कृतीशील सत्यशोधक / १४