पान:महाराजा सयाजीराव - कृतीशील सत्यशोधक.pdf/१५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

सर्वात ‘कडवे’ विरोधक होते. असे असूनसुद्धा फुल्यांची झेप वधू-वरांच्या माता-पित्यांपलीकडे गेली नाही. सयाजीराव मात्र लग्न लावणाऱ्या भटजीला जेव्हा कायद्याच्या चौकटीत दंड देण्याची तरतूद करतात तेव्हा ते शिवराय आणि शंभूराजे यांचा पुरोहितशाहीने केलेल्या छळाचा एकप्रकारे 'सूड' उगवताना दिसतात. भारतीय धर्मक्रांतीच्या महाचर्चेत सयाजीराव या 'क्रांतीसूर्या'ला बेदखल करण्याच्या पार्श्वभूमीवर जेव्हा आपण हे नवे संशोधन अभ्यासतो तेव्हा आपली प्रबोधन परंपरा किती 'निसत्व' झाली आहे याचा साक्षात्कार होतो. सयाजीचिंतन ही आपली तातडीची गरज का आहे हे समजण्यासाठी एवढी चर्चा पुरेशी आहे.
महात्मा फुल्यांच्या पुढची झेप

 पुरोहितशाहीच्या विळख्यात जगातील सर्वच मानवी समाज ‘गुदमरत’ जगत आले आहेत. फुल्यांनी म्हणूनच या पुरोहितशाहीवर घणाघात केले. या पुरोहितशाहीला पर्याय देण्याचा ‘प्रतीकात्मक' प्रयत्न केला. या प्रयत्नाचाच भाग म्हणून महात्मा फुलेंनी सत्यशोधक समाजाच्या सत्यशोधक विधिसंबंधी मंगल अष्टकांसह सर्व पूजा विधींची छोटी पुस्तिका १८८७ मध्ये प्रकाशित केली होती. फुल्यांचे हे काम नेमके याच वर्षी १८८७ मध्ये 'नीतीविवाह चंद्रिका' हा ग्रंथ मराठीत प्रकाशित करून सयाजीराव पुढे व्यापक करताना दिसतात. 'हे असे का घडले' याचा शोध घेण्याचे आमच्या 'महान' संशोधन

महाराजा सयाजीराव : कृतीशील सत्यशोधक / १५