पान:महाराजा सयाजीराव - आरोग्य आणि व्यायामविषयक कार्य.pdf/९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

ज्युबिली वेळी सयाजीरावांनी संस्थानच्या पाणीपुरवठ्यासाठी ५,५०,००० रु. निधी दिला. आजच्या रुपयाच्या मूल्ल्यात या निधीची रक्कम १४२ कोटी २६ लाख ६६ हजार रुपयांहून अधिक भरते. केवळ पाणीपुरवठ्यासाठी दिलेली ही रक्कम सयाजीरावांमधील प्रजाहितदक्ष राजाची साक्ष देते.
स्वतंत्र वैद्यकीय खाते
 संस्थानातील लोकांना वैद्यकीय सुविधा पुरविण्याच्या हेतूने १८७६ मध्ये वैद्यकीय खाते सुरू करण्यात आले. त्यावर दरबारी वैद्य असणाऱ्या डॉ. कोडी यांची मुख्य वैद्यकीय अधिकारी म्हणून नेमणूक केली. आपल्या प्रजेला वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याच्या ध्यासातून सयाजीरावांनी संस्थानात अनेक रुग्णालयांची स्थापना केली. बडोद्यात १८७७-७८ मध्ये 'सयाजीराव मिलिटरी हॉस्पिटल' सुरू करण्यात आले. १८८१- ८२ ला बडोदा शहराच्या मध्यभागी ' जमनाबाई हॉस्पिटल'

सुरू केले. या इमारतीवर १,५६,२८० रु. खर्च करण्यात आला. ही बडोदा शहरातील सर्वात मोठी वैद्यकीय संस्था होती. त्यात वार्षिक ४४,००० रुग्णांवर उपचार होत असे. १८८७ ला 'न्यू स्टेट हॉस्पिटल, बडोदा'ची स्थापना केली. या इमारतीवर २,०७,५५१ रु. खर्च झाला. १९०६-०७ साली डफरीन रुग्णालयासाठी एक क्ष-किरण उपकरण मागविले आणि यावर काम करण्यासाठी मि. सुमंत बि. मेहता या अधिकाऱ्याला उपकरणाच्या प्रशिक्षणासाठी डेहराडूनला पाठविले. १८८३-८४ साली बडोदा संस्थानात १२

महाराजा सयाजीराव : आरोग्य आणि व्यायामविषयक कार्य / ९