पान:महाराजा सयाजीराव - आरोग्य आणि व्यायामविषयक कार्य.pdf/८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 ३. नगररचनेची सुसूत्रे अमलात आणून आरोग्य घातक अशा नव्या इमारती किंवा जागा तयार होऊ न देणे व अशा जुन्या इमारतींची सुधारणा करणे.
 ४. शाळा व कारखान्यांसंबधी योग्य कायदे करून लोकांची शरीरयष्टी बळकट राहील अशी योजना करणे.
 सयाजीरावांनी राबवलेला हा कार्यक्रम म्हणजे त्यांच्या सार्वजनिक आरोग्य संवर्धनाच्या दिशेने केलेली वाटचाल होती.

 प्रजेचे आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी सर्वप्रथम स्वच्छ पाण्याची आवश्यकता असते. त्यामुळे सयाजीरावांनी बडोदा संस्थानात अनेक पाणीपुरवठा योजना राबविल्या. २९ मार्च १८९२ ला बडोदा पाणीपुरवठा योजनेचा महाराजांच्या हस्ते उद्घाटन समारंभ पार पडला. या योजनेसाठी आजवा येथे ३ मैल लांबीचे मातीचे धरण बांधण्यासाठी जानेवारी १८८५ ते जून १८९० इतका कालावधी लागला. या तलावातील पाणी ८ वर्षे पुरणारे आहे. या कामावर एकूण ३० लाख रुपये खर्च आला. या योजनेमुळे बडोदा शहरात पहिल्यांदाच गाळलेले व शुद्ध पाणी पिण्यासाठी उपलब्ध झाले. हे काम सुरू असताना येथील कामगारांना वैद्यकीय सेवा देण्याच्या हेतूने आजवा येथे तात्पुरत्या स्वरूपाचा दवाखाना सुरू करण्यात आला. २४ एप्रिल १८९७ ला संखेडा पाणीपुरवठा योजनेचे उद्घाटन झाले आणि या तारखेपासूनच लोकांना पाणीपुरवठा केला जाऊ लागला. या पाणीपुरवठ्यावर १६,९३३ रु. खर्च आला. मार्च १९०७ ला महाराजांच्या सिल्व्हर

महाराजा सयाजीराव : आरोग्य आणि व्यायामविषयक कार्य / ८