पान:महाराजा सयाजीराव - आरोग्य आणि व्यायामविषयक कार्य.pdf/२७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 राष्ट्रीय खेळासंबंधीची तसेच जुन्या खेळांसह नव्या पाश्चात्य खेळांची माहिती जनतेला करून देण्यासाठी महाराजांनी क्रीडा ग्रंथमाला सुरू केली. या मालेतून नऊ-दहा पुस्तके प्रसिद्ध करण्यात आली. कालेलकरांनी लिहिलेले व देवधरांनी दुरुस्त करून प्रसिद्ध केलेले ‘मराठी खेळाचे पुस्तक' हे अत्यंत महत्त्वाचे पण आज दुर्मिळ असणारे पुस्तक छापण्यासाठी महाराजांनी ४,००० रुपये मदत दिली. जुम्मादादा व्यायाम मंदिराचे संस्थापक राजरत्न प्रो. माणिकराव यांनी 'व्यायाम मंदिर', 'शरीरशास्त्र', ‘मालिश', 'संघव्यायाम' हे महत्त्वपूर्ण ग्रंथ लिहिले. १,८०० शस्त्रांची सविस्तर माहिती देणारा 'प्रतापशस्त्रागार' हा त्यांचा ग्रंथ आजही अत्यंत महत्त्वपूर्ण ठरतो.

 याबरोबरच 'पदाति व्यायाम अर्थात पायदळ पलटणीची ‘कवायत’, ‘शस्त्रागार' इ. मराठी आणि गुजराथीतील काही पायाभूत ग्रंथ महाराजांनी तयार करून घेतले. संस्थानच्या शिक्षण विभागातर्फे सचित्र खेळांचे पुस्तक, बालवीरांचे खेळ, खेळांचा अभ्यास, लहान मुलांचे खेळ, आट्या-पाट्या, खो-खो, हुतूतू, मैदानी खेळांचे नियम, विटीदांडू नियम ही पुस्तकेदेखील महाराजांनी प्रकाशित केली. इतकेच नव्हे तर इंग्रजीत असणारे कवायतीचे हुकूम हिंदी आणि मराठीमध्ये भाषांतरित करण्याचे काम सयाजीरावांनी प्रो. माणिकरावांवर सोपविले होते. प्रो. माणिकरावांच्या कार्याचा गौरव म्हणून सयाजीरावांनी १९०६ मध्ये त्यांना 'राजरत्न' पदवी देऊन गौरवले. विशेष म्हणजे

महाराजा सयाजीराव : आरोग्य आणि व्यायामविषयक कार्य / २७