पान:महाराजा सयाजीराव - आरोग्य आणि व्यायामविषयक कार्य.pdf/२६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

पाठिंबा या मासिकासाठी उपकारक ठरला. याच आबासाहेब मुजुमदारांनी १९३६ ते १९४९ या कालावधीत 'व्यायामकोश' हा अद्वितीय कोश दहा खंडात प्रसिद्ध केला. हा व्यायामासंदर्भातला मराठीतील आणि बहुधा कोणत्याही भारतीय भाषेतील पहिला कोश आहे. १९३६ मध्ये महाराजांनी या प्रत्येक खंडाच्या १०० प्रती विकत घेण्याच्या बदल्यात एकरकमी ७,००० रु. ची मदत मुजुमदारांना केली.

 व्यायाम मासिक असो किंवा व्यायामकोश असो या कामाला फक्त प्रेरणा नव्हे तर भक्कम आर्थिक साहाय्य करून महाराजांनी हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प पूर्ण करण्यामध्ये ऐतिहासिक भूमिका पार पाडली होती. आजही या कोशाच्या जवळपासही जाणारे काम मराठीत झालेले नाही. यातच महाराजांच्या कालातीत कर्तृत्वाचा पुरावा मिळतो. १९३६ चे ७,००० रु. म्हणजे आजच्या रुपयाच्या मूल्यात ११ कोटी ७९ लाख रुपये होत. विशेष म्हणजे महाराजांचे प्रतापसिंह यांनी महाराजांचा हा वारसा जपत १९४८ मध्ये ९ व्या खंडासाठी २,००० रुपये व १९४९ मध्ये १० व्या खंडासाठी २,००० रुपये असे एकूण ४,००० रुपये दिले. म्हणजेच या प्रकल्पाचा पाया महाराजांनी घातला आणि पुढे १३ वर्षांनी महाराजांचे नातू प्रतापसिंह यांनी या प्रकल्पाच्या पूर्णत्वाचा कळस चढविला. हा सुद्धा महाराजांच्या कार्याचाच प्रभाव होता. याच मुजुमदारांनी १९५० मध्ये ७३४ पृष्ठांचा 'An Encyclopedia of Indian Physical Culture' हा ग्रंथ तयार केला.

महाराजा सयाजीराव : आरोग्य आणि व्यायामविषयक कार्य / २६