पान:महाराजा सयाजीराव - आरोग्य आणि व्यायामविषयक कार्य.pdf/२४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

भारतीय मर्दानी खेळांच्या स्पर्धांचे आयोजन करण्यात येत असे. संस्थानातील खेळाडूंच्या शारीरिक क्षमतांचा पुरेपूर विकास करण्याचा उद्देश या स्पर्धांच्या आयोजनामागे होता. १९२७ - २८ मध्ये हिंदविजय जिमखान्याला मर्दानी खेळांच्या स्पर्धेच्या आयोजनासाठी १,००० रु. चे अतिरिक्त अनुदान देण्यात आले. १९२९-३० मध्ये आयोजित करण्यात आलेल्या ११ व्या अखिल भारतीय मर्दानी खेळांच्या स्पर्धेसाठी १,००० रु. अनुदान दिले. भारताच्या विविध भागातून खेळाडू या स्पर्धेत सहभागी झाले होते. या स्पर्धेत महिलांची संख्याही उल्लेखनीय होती. यावेळी महिला खेळांच्या बक्षीस वितरण समारंभाचे अध्यक्षस्थान सयाजीरावांच्या पत्नी महाराणी चिमणाबाई यांनी भूषवले.

 १९३०-३१ मध्ये हिंदविजय जिमखान्याने आयोजित केलेल्या अखिल भारतीय मर्दानी खेळांच्या स्पर्धेसाठी २,००० रु. अनुदान दिले. १९३२-३३ व १९३३-३४ मध्ये एकूण ४,००० रु.चे अनुदान देण्यात आले. १९२७-२८ व १९२९-३० ते १९३३-३४ अशा ५ वर्षांच्या काळात भारतीय मर्दानी खेळांच्या आयोजनासाठी सयाजीरावांनी एकूण ८,००० रु. चे अनुदान दिले. आजच्या रुपयाच्या मूल्यात ही रक्कम १ कोटी ९६ लाख रु. हून अधिक भरते. भारतीय खेळांच्या उत्कर्षासाठी झटणारा सयाजीरावांसारखा दुसरा प्रशासक आधुनिक भारताच्या इतिहासात क्वचितच आढळेल.

महाराजा सयाजीराव : आरोग्य आणि व्यायामविषयक कार्य / २४